गणेशोत्सवात मोदकाला नवा साज, बिस्कॉफपासून कुनाफापर्यंत वेगळे फ्लेवर्स बाजारात
गणपतीच्या नैवेद्यातला मोदक यंदा नव्या रुपात दिसतोय. पारंपरिक उकडीच्या मोदकासोबतच बिस्कॉफ, कुनाफा, हॅझलनटसारखे गॉरमेट फ्लेवर्सही खवय्यांना खुणावत आहेत.
गणेशोत्सव आणि मोदक यांचं नातं जुनं आणि घट्ट आहे. बाप्पा घरात येतो आणि सोबत येतो तुपाचा घमघमाट, नारळ-गुळाच्या सारणाचा वास आणि वेलचीचा दरवळ. आरती कधी संपते आणि प्रसादाचा पहिला मोदक हातात कधी येतो, याची ओढ लहानपणापासून सगळ्यांनाच असते. पण आता कुणी "तुझ्या मोदकात काय आहे" असं विचारलं, तर उत्तर फक्त नारळ आणि गूळ एवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. मोदकाचा आकार तोच असला तरी आतल्या चवींचं जग वेगानं बदलतंय.
नवे फ्लेवर्स बाजारात आले तरी पारंपरिक उकडीच्या मोदकाची जादू अजून कमी झालेली नाही. तांदळाच्या पिठाचं मऊसूत आवरण, आतमध्ये नारळ-गुळाचं भरगच्च सारण, वेलचीचा सुगंध आणि वरून घातलेलं साजूक तूप, ही चव म्हणजे गणेशोत्सवाची खरी ओळख. काही पदार्थांना नव्यानं मांडायची गरजच नसते, त्यांची मूळ चव जपणं हेच त्यांचं वैशिष्ट्य ठरतं. उकडीचा मोदक याच गटात मोडतो.
पारंपरिक चवीला थोडा वेगळा टच देण्यासाठी काजू मिक्स आणि मावा मिक्स मोदक आता लोकांना आवडू लागलेत. काजू आणि माव्यामुळे मोदकाला मऊ, क्रीमी आणि तोंडात विरघळणारा पोत मिळतो. त्यामुळे एका घासात मोदक आणि पारंपरिक भारतीय मिठाई, दोन्हीची चव एकत्र अनुभवता येते.
मोदकाच्या बदलत्या रुपातला सगळ्यात मोठा प्रयोग म्हणजे जगभर लोकप्रिय असलेल्या डेझर्ट फ्लेवर्सची एन्ट्री. बिस्कॉफ, हॅझलनट, कुनाफा पिस्ता आणि कुकीज अँड क्रीमसारख्या चवी आता मोदकाच्या रुपात मिळायला लागल्यात. याशिवाय ओरिओ, ब्लूबेरी आणि रेड वेल्वेट या फ्लेवर्सनाही मोदकाचं रूप देण्यात आलंय. जगदीश फरसाणच्या गॉरमेट मोदकांच्या यादीत अशा वेगवेगळ्या फ्लेवर्सचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे मिठाईचा बॉक्स उघडल्यावर आता प्रश्न "मोदक खायचा का" हा नसून "आधी कोणता मोदक चाखायचा" असा झालाय.
परदेशी डेझर्ट्सच्या चवी मोदकात आल्या असल्या तरी पारंपरिक भारतीय मिठाईही मागे राहिलेली नाही. केसर पिस्ता मोदकात केशराचा सुगंध आणि पिस्त्याची नट्टी चव मिळते. तसंच लहानपणापासून ओळखीचा असलेला मोतीचूर लाडूही आता मोदकाच्या आकारात मिळतोय. त्यामुळे नेहमीच्या मिठाईची चव नव्या रुपात चाखायला मिळते.
आजचा मोदकांचा बॉक्स म्हणजे पारंपरिक की आधुनिक, यापैकी एक निवडायची गरजच उरलेली नाही. एकाच बॉक्समध्ये उकडीचा मोदक, केसर पिस्ता, मावा आणि मोतीचूरसोबत बिस्कॉफ, कुनाफा किंवा हॅझलनटसारखे गॉरमेट पर्यायही दिसतात. कुणाला पारंपरिक नारळ-गुळाची चव हवी असते, तर कुणाला नवा फ्लेवर ट्राय करायचा असतो. त्यामुळे प्रत्येक पिढीला आपल्या आवडीचा मोदक निवडायची संधी मिळते.
मोदकाचं सारण बदललं, फ्लेवर्स बदलले आणि सादरीकरणही आधुनिक झालं. भारतीय मिठाईपासून आंतरराष्ट्रीय डेझर्टपर्यंत अनेक चवी मोदकात सामावल्या गेल्या. पण त्यामागची भावना मात्र आजही तशीच आहे. बाप्पाचं आगमन, त्याला मोदकांचा नैवेद्य आणि नंतर कुटुंबासोबत प्रसाद खाणं, ही परंपरा अजूनही कायम आहे. म्हणूनच मोदकात नारळ-गूळ असो किंवा बिस्कॉफ, हॅझलनट आणि पिस्ता, गणेशोत्सवाचा आनंद आजही त्या एका गोड घासातूनच उलगडतो.