देवळी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळांचा डिजे-लेझरमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
देवळी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी डि.जे./डॉल्बी साऊंड व लेझर लाईट न वापरण्याचे लेखी हमीपत्र पोलिसांना दिले असून, गणराया अवार्ड २०२६ अंतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनी प्रदूषण व प्रकाश प्रदूषणामुळे नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना, विद्यार्थ्यांना आणि आजारी व्यक्तींना त्रास होऊ नये यासाठी पोलीस विभागाने आधीच पुढाकार घेतला होता. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत पोलिसांनी डि.जे./डॉल्बी साऊंड व लेझर लाईटचा वापर न करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला देवळी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सर्व मंडळांनी डि.जे./डॉल्बी साऊंड व लेझर लाईट न वापरण्याबाबत लेखी हमीपत्र पोलीस विभागाला सादर केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, ध्वनी प्रदूषण टाळणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे या दृष्टीने मंडळांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव आहे. याच उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीला चालना देण्याच्या उद्देशाने वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेल्या सूचनेनुसार देवळी पोलीस स्टेशनतर्फे गणराया अवार्ड २०२६ हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये सुरक्षित, शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी विविध विषयांवर आधारित उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
काळा मारोती मंदिर चौक देवळी येथील बाल गणेश मित्र मंडळ समितीतर्फे १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी रस्ते सुरक्षा या विषयावर जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर २०२६ रोजी विविध आजारांवर आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असून, त्याच दिवशी सायंकाळी एस.एन.जे. महाविद्यालय देवळी येथील एनसीसी कॅडेट्समार्फत सायबर सुरक्षित गणेशोत्सव व अंमली पदार्थविरोधी मोहीम (नशेला नकार, जीवनाला स्वीकार) या विषयावर पथनाट्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे.
२१ सप्टेंबर २०२६ रोजी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती व पर्यावरण या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्याच दिवशी लोकमान्य टिळक चौक देवळी येथील दत्त मंदिर बाल गणेश मंडळातर्फे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच श्री नवयुवक गणेश मंडळ, भिडीतर्फे व्यसनमुक्तीबाबत देखावा, चित्रकला स्पर्धा आणि वेगवेगळ्या विषयांवर पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळात नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही संशयास्पद बाब किंवा कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित माहिती असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन किंवा आपत्कालीन हेल्पलाईन ११२ वर संपर्क साधावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.