Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; NEET पेपरफुटीवर नेतिवलीच्या
कल्याण पूर्वेतील जय गणेश मित्र मंडळाने यंदा NEET पेपरफुटी आणि त्यातून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या विषयावर देखावा सादर केला आहे.
कल्याण पूर्वेतील जय गणेश मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात एक वेगळाच आणि महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. सण-उत्सवांना अनेकदा केवळ व्यावसायिक स्वरूप येत असताना, या मंडळाने शिक्षण क्षेत्रातील काळा बाजार आणि पेपरफुटीमुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या गंभीर विषयावर प्रकाश टाकत खऱ्या अर्थाने समाज प्रबोधनाचे काम केले आहे. पेपरफुटी आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार हा थेट विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या भविष्याशी जोडलेला प्रश्न असल्याने यावर उघडपणे बोलणे गरजेचे असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे.
अपयश किंवा व्यवस्थेतील त्रुटींमुळे तरुण पिढी टोकाचे पाऊल उचलते, हाच मुद्दा घेऊन कल्याण पूर्वेतील जय गणेश मित्र मंडळाने हा अनोखा देखावा सादर केला आहे. गणेश उत्सवाचा मूळ उद्देश काय होता, हे या देखाव्यातून पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले आहे. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात समाज प्रबोधनासाठी आणि सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र आणण्यासाठी केली होती, हाच धागा पकडून मंडळाने यंदा हा विषय निवडल्याचे सांगितले जाते.
कल्याण पूर्वेतील जय गणेश मंडळ दरवर्षी सामाजिक प्रश्नांवर देखावा सादर करून समाज प्रबोधनाचे काम करत असते. हे एकाच वर्षापुरते मर्यादित नसून मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी सामाजिक प्रश्नावर देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृती करणे हा मंडळाचा उद्देश असल्याने यंदाही मंडळाचा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे.
कल्याण पूर्वेतील हे जय गणेश मंडळ नेतिवलीचा राजा म्हणून ओळखले जाते आणि यंदा या मंडळाला ४० वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणजे मंडळाच्या स्थापनेला आता चार दशके उलटली आहेत. याआधी मंडळाने मराठी भाषा अभिमान आणि ऑनलाइन लॉटरी यांसारख्या विषयांवरही देखावे साकारले होते, म्हणजे समाजातील ज्वलंत प्रश्न मांडण्याची मंडळाची ही जुनी सवय आहे. यंदा नीट पेपरफुटीचा विषय घेण्यात आला आहे. पेपरफुटीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे देखाव्यातून दाखवण्यात आले आहे. आपल्या देशातील परीक्षा पद्धती पारदर्शक नसल्याचा फटका पालक आणि विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो, असे मंडळाचे म्हणणे आहे. याउलट, पाश्चिमात्य देशांमध्ये परीक्षा प्रक्रिया आणि पद्धत किती पारदर्शक आहे, तसेच चीनमध्ये ती त्याहूनही अधिक पारदर्शक कशी आहे, हे देखील या देखाव्यातून दाखवण्यात आले आहे, जेणेकरून भारतातील व्यवस्थेतील त्रुटी ठळकपणे समोर याव्यात.
जय गणेश मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला असून, यासाठी मंडळाचे पदाधिकारी सुनील केणे, नितीन बनसोडे, विलास बाईत, आनंद शिंदे आणि सतीश सोनावणे यांनी परिश्रम घेतले.