सडक अर्जुनी तालुक्यातील २० गावांत जलसंधारण, हवामानपूरक शेतीसाठी विशेष प्रकल्प
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात एचडीएफसी बँक परिवर्तन-विदर्भ वॉटर स्टुअर्डशिप प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टकडून मे २०२६ पासून काम सुरू.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील २० गावांमध्ये एचडीएफसी बँक परिवर्तन-विदर्भ वॉटर स्टुअर्डशिप प्रकल्प (VWSP) राबवला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प आकाराला आला असून, जलसंधारण, हवामानपूरक शेती, ग्रामस्तरीय संस्थांचे सक्षमीकरण आणि शाश्वत उपजीविका विकास या मुद्द्यांवर यात भर दिला जात आहे. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) या संस्थेमार्फत मे २०२६ पासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे.
या प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार अलीकडेच करण्यात आला. विदर्भातील ७ जिल्हे, ९ ब्लॉक आणि ५३५ गावांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. यापैकी १८५ गावांत एचडीएफसी बँक परिवर्तनमार्फत, तर उर्वरित ३५० गावांत PoCRA योजनेमार्फत विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन, हवामानपूरक शेती, जलसंधारण आणि शाश्वत ग्रामीण विकास या माध्यमातून विदर्भाचा सर्वांगीण विकास साधणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. सामंजस्य कराराच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमामुळे विदर्भाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
सडक अर्जुनी तालुक्यातील सर्व २० गावांमध्ये प्रकल्पांतर्गत ग्राम विकास समित्या (VDCs) स्थापन करण्यात आल्या आहेत. यामुळे गावपातळीवर सहभागी नियोजन आणि स्थानिक निर्णयप्रक्रियेला चालना मिळत आहे. खरीप हंगामात शेतकरी शेतशाळा, कृषी प्रात्यक्षिके आणि अभ्यासदौरे घेऊन शेतकऱ्यांना हवामानपूरक शेती पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीबाबत मार्गदर्शन दिले जात आहे. त्याचबरोबर वंचित व गरजू कुटुंबांसाठी शेळीपालन आणि परसबागेतील कुक्कुटपालन यासारख्या शाश्वत उपजीविका उपक्रमांसाठी लाभार्थी निवडीची प्रक्रियाही सुरू आहे. यात भूमिहीन कुटुंबे, विधवा, महिला-प्रमुख कुटुंबे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे.
PoCRA टप्पा-२ अंतर्गत ३२ गावांचा समावेश शासकीय अभिसरणाच्या माध्यमातून या उपक्रमात करण्यात येत आहे. गावपातळीवर 'परिवर्तन भागीदार' नेमून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देणे, त्या योजनांचा लाभ मिळवून देणे आणि संबंधित विभागांशी समन्वय साधणे यावर भर दिला जाणार आहे.
डिसेंबर २०२६ पासून बोडी नूतनीकरण, नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट नाला बांध, नवीन बोडी बांधणी तसेच इतर पाणलोट विकासाची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेतली जाणार आहेत. या कामांमुळे पाणीसाठा वाढेल, भूजल पुनर्भरणाला चालना मिळेल, शेतीची उत्पादकता वाढेल आणि गावांची हवामान बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता बळकट होईल, असे सांगण्यात आले. या प्रकल्पाचे काम व्रोटचे संचालक प्रकाश केसकर, प्रादेशिक व्यवस्थापक शरद भनगडे आणि सडक अर्जुनीचे प्रकल्प व्यवस्थापक राहुल पंचभाई हे पाहत आहेत.