मोदींच्या ७६ व्या वाढदिवशी वडनगरमध्ये 'सेवा संकल्प अभियान'; शिंदेंकडून गुजरातीत शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधील वडनगरमध्ये अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महिनाभर चालणाऱ्या अभियानाला सुरुवात झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७६ वा वाढदिवस आज देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. याच निमित्ताने गुजरातमधील त्यांच्या जन्मगावी वडनगरमध्ये 'सेवा संकल्प अभियान' या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मोदींच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या पार्श्वभूमीवर हे अभियान महिनाभर चालणार आहे.
या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात गुजराती भाषेतून केली, हे विशेष लक्षवेधी ठरलं. "वडनगरनी धरतीना सपूत, देश अने दुनियाना लाडला बनी गया छे" असं गुजरातीत बोलत त्यांनी वडनगरच्या भूमीवर येऊन आपल्याला अभिमान वाटत असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेच्या वतीने तसंच शिवसेनेच्या वतीने त्यांनी नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मोदींच्या वयापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाची उंची बघितली पाहिजे, असं मत शिंदे यांनी मांडलं. "मोदीजींच्या कर्तृत्वाची गणना हिमालयाच्या उंचीने होते आणि जनतेसाठी त्यांनी केलेलं काम अरबी समुद्राच्या खोलीने मोजलं जाऊ शकतं," असं ते म्हणाले. वडनगरच्या मातीतून सुरू झालेला मोदींचा प्रवास देशातल्या आणि परदेशातल्या व्यासपीठांपर्यंत कसा पोहोचला, हे सांगताना शिंदेंनी 'वडनगर ते वाराणसी' या सेवा यात्रेचा उल्लेख केला. ही यात्रा सेवा, संकल्प आणि विकासाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासाचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं.
अमित शाह यांनी एनडीएच्या बैठकीत मोदींच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाचा उल्लेख केला होता, याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्रीपदापासून पंतप्रधानपदापर्यंतच्या प्रवासात पदं आणि जबाबदाऱ्या बदलत गेल्या असल्या तरी सेवेचा संकल्प मात्र कायम राहिला, असं शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान, वडनगरपासून वाराणसीपर्यंत 'सेवा संकल्प' बाइक यात्रेलाही सुरुवात झाली असून ही यात्रादेखील मोदींच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाशी जोडण्यात आली आहे.
आपल्या भाषणात शिंदे यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा तसंच देशाच्या बदलत्या अर्थव्यवस्थेचाही उल्लेख केला. गॅस कनेक्शन, घर, बँक खातं आणि नळाचं पाणी यांसारख्या योजनांचा संदर्भ देत त्यांनी जनसेवेचा मुद्दा मांडला. याशिवाय 'मेक इन इंडिया', 'स्टार्टअप इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' या उपक्रमांचा उल्लेख करत देशाच्या प्रगतीवर भाष्य केलं. कलम ३७०, राष्ट्रीय सुरक्षा आणि विकसित भारताचा संकल्प यांचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. वडनगरमधील या कार्यक्रमातून मोदींच्या वाढदिवसासोबतच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांचा प्रवासही अधोरेखित करण्यात आला. 'सेवा संकल्प अभियान' देशभरात विविध जनसेवा उपक्रमांच्या माध्यमातून राबवलं जाणार आहे.