तेजस, एचटीटी-40 विमाने आणि ध्रुव एनजी हेलिकॉप्टर हवाई दलाकडे सुपूर्द होणार
HAL कडून 18 सप्टेंबर 2026 रोजी बंगळूरुमध्ये हस्तांतरण कार्यक्रम, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार
भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार असून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL कडून 18 सप्टेंबर 2026 रोजी बंगळूरु येथे एका खास कार्यक्रमात नवीन विमाने सुपूर्द केली जाणार आहेत. या कार्यक्रमात हवाई दलाला LCA तेजस FOC हे दुहेरी आसनी प्रशिक्षक विमान आणि HTT-40 हे मूलभूत प्रशिक्षक विमान दिले जाणार आहे. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू उपस्थित राहणार आहेत. यासोबतच पवन हंस लिमिटेडलाही ध्रुव नेक्स्ट जनरेशन म्हणजेच ध्रुव एनजी हे हेलिकॉप्टर सुपूर्द केले जाणार आहे.
नवीन तेजस प्रशिक्षक विमानामुळे हवाई दलातील वैमानिकांना आधुनिक लढाऊ विमाने उडवण्याचे अधिक प्रभावी आणि आधुनिक प्रशिक्षण मिळणार आहे. हे विमान दुहेरी आसनी असल्याने प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक दोघांनाही एकाच विमानातून प्रशिक्षण घेता येईल. दुसरीकडे HTT-40 हे मूलभूत प्रशिक्षक विमान वैमानिकांच्या प्राथमिक प्रशिक्षणासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
LCA तेजस FOC हे दोन आसनी विमान एक प्रगत लढाऊ प्रशिक्षक विमान असून HAL ने विकसित केलेले हे दोन आसनी सुपरसॉनिक जेट आहे. भारतीय हवाई दलाच्या नवीन वैमानिकांना लढाऊ विमाने उडवण्याचे प्रशिक्षण देणे हे याचे मुख्य काम आहे. हे विमान केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित नसून गरज पडल्यास खऱ्या लढाऊ विमानाप्रमाणे शत्रूवर हल्लाही करू शकते. यात आधुनिक ग्लास कॉकपिट आणि रडार प्रणाली बसवण्यात आली असून अचूक शस्त्रे आणि हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे डागण्याची पूर्ण क्षमता या विमानात आहे.
HTT-40 हे संपूर्णपणे भारतात डिझाइन आणि विकसित करण्यात आलेले टर्बोप्रॉप प्रशिक्षक विमान आहे. हवाई दलाच्या नवीन कॅडेट्सना मूलभूत उड्डाणाचा पहिला टप्पा शिकवण्यासाठी याचा वापर होणार आहे. तरुण वैमानिक उड्डाण शिकताना या विमानाचा सुरुवातीचा टप्पा म्हणून उपयोग होईल. यात आधुनिक डिजिटल स्क्रीन आणि प्रगत सुरक्षा उपकरणे बसवण्यात आली आहेत. आणीबाणीच्या स्थितीत वैमानिकाचे संरक्षण व्हावे यासाठी यात झिरो-झिरो इजेक्शन सीटची सोय आहे. कमी वेगातही हे विमान उत्कृष्ट संतुलन राखत असल्याने उड्डाण प्रशिक्षण अधिक सुरक्षित होणार आहे.
पवन हंस लिमिटेडला मिळणारे ध्रुव नेक्स्ट जनरेशन हेलिकॉप्टर भारताच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टरची ही आधुनिक नागरी आवृत्ती आहे. पवन हंस याचा वापर व्हीआयपींच्या प्रवासासाठी तसेच दुर्गम भागांतील संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी करणार आहे. समुद्रातील तेल उत्खनन प्लॅटफॉर्मवर मदत साहित्य आणि कर्मचारी पोहोचवण्यासाठीही या हेलिकॉप्टरचा वापर होईल. यात दोन शक्तिशाली इंजिने बसवण्यात आली असून त्यामुळे खराब हवामानातही सुरक्षित उड्डाण शक्य होणार आहे. या हेलिकॉप्टरची नवीन केबिन अधिक आरामदायक असून त्यात आधुनिक नेव्हिगेशन उपकरणेही आहेत.
संरक्षण मंत्रालयाच्या मते स्वदेशी तंत्रज्ञान आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला चालना देण्याच्या दिशेने ही महत्त्वाची आणि ऐतिहासिक घडामोड आहे. या विमानांच्या आणि हेलिकॉप्टरच्या सुपूर्दगीमुळे भारतीय संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी क्षमतांना आणखी बळ मिळणार आहे.