Thane Metro: ठाणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर ठाण्यात मेट्रो धावणार; तारीखही ठरली, पाहा नवीन अपडेट्स
कासारवडवली ते नितीन कंपनी या मार्गावरील ट्रायल रन यशस्वी झाल्यानंतर ठाणे मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबरअखेरपर्यंत सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ठाणेकरांसाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे मेट्रोचे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहे. महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) राबवल्या जाणाऱ्या या मेट्रो प्रकल्पांतर्गत कासारवडवली ते नितीन कंपनी या मार्गावरील ट्रायल रन नुकतीच यशस्वीपणे पार पडली. या मार्गावर मेट्रो प्रत्यक्षात धावू शकते की नाही, हे तपासण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती आणि ती यशस्वी झाल्याचे समोर आले. या ट्रायलनंतर आता मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत पहिला टप्पा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमादरम्यान ठाणे मेट्रोबाबतची ही आनंदाची बातमी जाहीर केली. वडाळा ते कासारवडवली या महत्त्वाच्या मेट्रो मार्गिकेला आवश्यक असणारे सुरक्षा प्रमाणपत्र (सीएमआरएस) मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. हे सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल करता येत नाही, त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळणे प्रकल्पासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रशासनाकडून डिसेंबरपर्यंत मेट्रो प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे. मेट्रोचा डौलदार आकार आणि तिच्या हॉर्नचा आवाज पाहण्यासाठी तसेच तिची पहिली झलक अनुभवण्यासाठी ठाण्यातील रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हजारो ठाणेकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे.
एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी लागणाऱ्या बहुतांश कायदेशीर तसेच तांत्रिक परवानग्या आधीच मिळवल्या आहेत. या मार्गावरील सर्व स्थानकांचे बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात असून, डिसेंबरअखेरपर्यंत ठाणेकरांना या मेट्रोतून प्रवास करता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात याच मेट्रो मार्गिकेवरील संरक्षक कठडा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेमुळे प्रकल्पाच्या कामाला काहीसा फटका बसला होता आणि आरडीएसओचे प्रमाणपत्र मिळण्यासही विलंब झाला होता. मात्र आता या सर्व तांत्रिक अडचणींवर मात करत प्रशासनाने कामाला पुन्हा एकदा गती दिली आहे.
मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ या दोन मार्गिका मिळून एकूण 32.32 किलोमीटर आणि 2.7 किलोमीटर असा हा संपूर्ण प्रकल्प असून, यामध्ये एकूण 32 स्थानकांचा समावेश आहे. मात्र प्रवाशांना लवकरात लवकर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पहिल्या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा 10.5 किलोमीटर लांबीचा पट्टा आधी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 10 आधुनिक स्थानकांचा समावेश असणार आहे, त्यामुळे कमी वेळेत मोठ्या संख्येने ठाणेकरांना मेट्रोचा लाभ घेता येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील ही 10 स्थानके पुढीलप्रमाणे आहेत - कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजीनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीवाडा आणि गायमुख.