अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याकडून वर्धा जिल्ह्यातील महसूल कार्यालयांची पाहणी
वर्धा जिल्ह्यात महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी विविध कार्यालयांना भेटी देत कामकाजाचा आढावा घेतला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी देऊन तिथल्या कामकाजाची पाहणी केली. महसूल विभाग गेल्या काही वर्षांत आधीपेक्षा जास्त लोकाभिमुख आणि गतिमान झाला असून, बदलत्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका समजून घेत लोककल्याणासाठी काम करायला हवे, असे त्यांनी ठिकठिकाणी भेटींदरम्यान सांगितले.
या दौऱ्यात जिल्हाधिकारी वान्मथी सी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, आकाश अवतारे व विश्वास सिरसाठ, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रदीप जगताप, सहजिल्हा निबंधक के.एस.कांबळे यांच्यासह महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सकाळी खारगे यांनी सेवाग्राम इथल्या महसूल मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयाला भेट देऊन सेवाग्राम मंडळांतर्गत होणाऱ्या कामकाजाचा आढावा घेतला.
त्यानंतर समुद्रपूर इथल्या तहसील कार्यालयात जाऊन तिथली तलाठी आस्थापना आणि संजय गांधी निराधार अनुदान विभाग यांची माहिती घेतली. संजय गांधी योजनेच्या एका महिला लाभार्थ्याला त्यांनी मोबाईलवर थेट संपर्क करत योजनेचा लाभ नियमितपणे मिळतो की नाही, याची विचारपूस केली. महसूल कार्यालयात येणारा सर्वसामान्य नागरिक आपले काम झाल्याचे समाधान घेऊनच बाहेर पडायला हवा, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाची वागणूक द्यावी आणि आत्मीयतेने संवाद साधावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
समुद्रपूर इथल्या सह दुय्यम निबंधक कार्यालयाला भेट देऊन खारगे यांनी मुद्रांक नोंदणीच्या कामाचा आढावा घेतला. मुद्रांक नोंदणीच्या एकूण 9 पैकी 6 कार्यालये शासकीय जागेत, तर उर्वरित खाजगी जागेत भरतात. काही ठिकाणी सुरू असलेल्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आणि वीज पुरवठा खंडित झाल्यास कामकाज बंद पडू नये यासाठी इन्व्हर्टर पुरवण्याचे निर्देश त्यांनी दूरध्वनीवरून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. यानंतर वर्धा तालुक्यातील करंजी भोगे इथे जाऊन त्यांनी शेतकऱ्यांसोबत ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात खारगे यांनी वर्धा इथल्या जिल्हा ग्रंथालयाला भेट देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ध्येय आणि दिशा निश्चित असायला हवी, योग्य दिशेने केलेली मेहनत नक्कीच यश मिळवून देते, असे खारगे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनी ग्रंथालयाची पाहणी करत तिथे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. यानंतर वर्धा शहरातील उपजिल्हा भूमी अभिलेख कार्यालय आणि जिल्हाधिकारी वॉर रूम यांनाही भेट देऊन तिथली माहिती जाणून घेतली.
दौऱ्याच्या शेवटी खारगे यांनी सेवाग्राम इथल्या बापू कुटीला भेट दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनेक वर्षे वास्तव्य राहिलेल्या या आश्रमात बापूंचे पहिले निवासस्थान, कस्तुरबा गांधी यांचे 'बा' निवास, बापू कुटी आणि बापूंचे तत्कालीन कार्यालय यांची त्यांनी पाहणी केली. आश्रम प्रतिष्ठानचे विजय तांबे यांनी आश्रमाची माहिती दिली. खारगे यांनी नोंदवहीत अभिप्राय नोंदवताना लिहिले, ''इथल्या परिसरात आल्यानंतर विलक्षण साधेपणातील ताकद लक्षात आली. 'साधी राहणी व उच्च विचारसरणी' ही म्हण कदाचित इथूनच उदयास आली असावी. इथल्या परिसराला दिलेली भेट आणि महात्मा गांधीजींच्या वस्तू व त्यांचे विचार यातून नवी ऊर्जा घेऊन बाहेर पडत असल्याचे समाधान आहे.''