गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:47 IST

पुणे महापालिकेच्या नऊ रुग्णालयांत अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष आणि अतिदक्षता विभाग उभारणार

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील रुग्णालये आणि प्रसूतिगृहे अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला असून, त्यात मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग आणि प्रसूती सुविधांचा समावेश असणार आहे.

पुणे महापालिकेच्या नऊ रुग्णालयांत अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष आणि अतिदक्षता विभाग उभारणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या ताब्यातील रुग्णालये आणि प्रसूतिगृहे अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यात अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग आणि प्रसूतीशी संबंधित विविध वैद्यकीय सुविधा उभारल्या जाणार आहेत.

या अद्ययावतीकरणात मॉड्युलर पद्धतीचे शस्त्रक्रिया कक्ष बांधले जाणार आहेत. संसर्ग टाळण्यासाठी विशेष यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक शस्त्रक्रिया मेज आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणे या कक्षांमध्ये बसवली जातील. रुग्णालयातील हवा शुद्ध आणि जंतुविरहित राहावी यासाठी आधुनिक हवा शुद्धीकरण व वातानुकूलन व्यवस्था उभारली जाणार आहे. त्याचबरोबर मध्यवर्ती वैद्यकीय वायू पाइपलाइन, परिचारिकांसाठी कॉल प्रणाली आणि विद्युत सक्शन यंत्रणा हे देखील या रुग्णालयांत उपलब्ध होणार आहे.

प्रसूतिगृहांमध्ये माता आणि नवजात बाळांच्या सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. आधुनिक प्रसूती खाटा, नवजात बाळांसाठी लागणारी आवश्यक उपकरणे, हवा शोषून घेणारी यंत्रणा आणि जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाची सुविधा उभी केली जाणार आहे. महिलांसाठी असलेल्या कक्षांत आधुनिक फर्निचर, स्वतंत्र साठवणुकीची सोय आणि स्वच्छतेच्या सुविधाही पुरवल्या जातील.

रुग्णालयातील प्रशासकीय आणि वैद्यकीय कामकाज अधिक जलद आणि पारदर्शक व्हावे यासाठी संगणकाच्या माध्यमातून चालणारी एकात्मिक प्रभाग व्यवस्थापन प्रणाली सुरू केली जाणार आहे.

बोपोडीतील कै. संजय गांधी रुग्णालयात दहा खाटांचा स्वतंत्र मॉड्युलर अतिदक्षता विभाग उभारला जाणार आहे. यामध्ये केंद्रीय निरीक्षण व्यवस्था, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि श्वसन उपचारांसाठी लागणाऱ्या सुविधा असतील. दुसरीकडे कमला नेहरू रुग्णालयातील नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागाची क्षमता वाढवण्यात आली आहे. गंभीर आजारी असलेल्या नवजात बाळांसाठी या विभागात दहा आधुनिक श्वसनयंत्रे आणि दहा सीपॅप यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत.

या योजनेत ज्या रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे त्यात बोपोडीतील संजय गांधी रुग्णालय, येरवड्यातील भारतरत्न राजीव गांधी रुग्णालय, धायरीतील मुरलीधर लायगुडे दवाखाना, घोरपडीतील महात्मा फुले दवाखाना यांचा समावेश आहे. याशिवाय बालाजीनगरमधील कै. काशिनाथ अनाजी धनकवडे प्रसूतिगृह, भवानी पेठेतील कै. चंद्रमामा सोनवणे रुग्णालय, मित्रमंडळ चौकातील राजमाता जिजाऊ प्रसूतिगृह, कोथरूडमधील कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतिगृह, मुंढव्यातील कै. सखाराम कुंडलिक कोद्रे प्रसूतिगृह आणि बोपोडीतील कै. द्वारकाबाई मुरलीधर खेडकर प्रसूतिगृह या रुग्णालयांचाही या अद्ययावतीकरण प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ