गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:38 IST

पोंभुर्णा सातारा कोमटी जि.प. शाळेत तीव्र पाणीटंचाई; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास भीक मागो आंदोलनाचा इशारा

पोंभुर्णा सातारा कोमटी जि.प. शाळेत तीव्र पाणीटंचाई; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास भीक मागो आंदोलनाचा इशारा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

पोंभुर्णा तालुक्यातील सातारा कोमटी येथील जिल्हा परिषद शाळेत पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नाहीच, शिवाय स्वच्छतागृहासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने लहान मुलांना रोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. शाळेत शिकणाऱ्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांना या पाणीटंचाईचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून, शिक्षकांनाही रोजच्या कामकाजात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पाणीटंचाईच्या प्रश्नावर युवासेनेने पुढाकार घेतला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना, पोंभुर्णा यांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पोंभुर्णा यांना निवेदन देण्यात आले आणि शाळेत तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या प्रश्नाबाबत यापूर्वीही अनेकदा संबंधित प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली होती, मात्र समस्या कायम राहिली, असे युवासेनेचे म्हणणे आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार युवासेनेने केली.

शाळेत पिण्याच्या पाण्यासोबतच मुतारी, शौचालय आणि इतर दैनंदिन कामांसाठीही पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. निवेदन देताना गटविकास अधिकारी मॅडम यांच्याशी शाळेतील पाणी समस्येबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी त्यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेत लवकरात लवकर शाळेत पाण्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी शाळेत नियमित पाणीपुरवठा होणे गरजेचे असल्याचे सांगत, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने कार्यवाही करून पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या १५ दिवसांत पाण्याची व्यवस्था न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना, पोंभुर्णा यांच्या वतीने भीक मागो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख महेश श्रीगिरीवार, रजत ढोंगे, शाळा व्यवस्थापन समिती सातारा येथील अध्यक्ष लतिश ठाकरे, उपाध्यक्ष विजय सिडाम, सदस्य महिंद्र सोनुले, सदस्य सुरेखा गुरनुले, महेश ठाकरे, अजित भडके, प्रीतम भडके, नितीन गुरनुले, सत्यपाल कुळमेथे तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांशी निगडित हा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा आणि दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने पाण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा उपस्थित पालक आणि युवासेनेने व्यक्त केली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ