गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:46 IST

नांदेड ते सावंतवाडीदरम्यान प्रथमच धावणार थेट विशेष रेल्वे, वेळापत्रक जाहीर

दक्षिण मध्य रेल्वेकडून मराठवाडा ते कोकण अशी पहिलीच थेट रेल्वेसेवा, प्रवासी संघटना आणि खासदारांच्या पाठपुराव्याला यश

नांदेड ते सावंतवाडीदरम्यान प्रथमच धावणार थेट विशेष रेल्वे, वेळापत्रक जाहीर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मराठवाड्यातील रेल्वे प्रवासी आणि कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते कोकणातील सावंतवाडीदरम्यान विशेष रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय घेतला असून, मराठवाड्यातून थेट कोकणासाठी रेल्वे धावण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ ठरणार आहे.

ही विशेष ट्रेन परभणी, परळी, लातूर रोड आणि पुण्यामार्गे धावणार आहे. यामुळे मराठवाड्यात राहणाऱ्या कोकणवासीयांना तसेच निसर्गरम्य कोकण पाहण्याची इच्छा असणाऱ्या पर्यटकांना थेट प्रवासाचा मोठा फायदा होणार आहे.

ही सेवा सुरू होण्यामागे प्रवासी संघटनांचा दीर्घकाळचा पाठपुरावा आहे. दरवर्षी गौरी-गणपतीच्या सणासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खास एसटी बसची व्यवस्था केली जाते. मात्र मराठवाड्यात राहणारे नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नांदेड ते सावंतवाडीदरम्यान थेट ट्रेन सुरू करावी, अशी मागणी 'मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ' या संघटनेकडून सातत्याने केली जात होती. या संघटनेने सिकंदराबाद, पुणे, मुंबई आणि कोकण विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत पाठपुरावा सुरू ठेवला होता.

या मागणीला मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ आणि कोकण रेल्वे विकास समितीसोबतच अनेक लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला. खासदार सुप्रिया सुळे, धाराशिवचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर, लातूरचे खासदार शिवाजीराव कल्गे आणि नांदेडचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह मध्य आणि दक्षिण-मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून एकत्रितपणे ही मागणी लावून धरली होती. प्रवाशांची वाढती संख्या आणि लोकप्रतिनिधींचा हा पाठपुरावा लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने 'नांदेड-सावंतवाडी रोड-नांदेड' (ट्रेन क्रमांक 07659/07660) ही विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. या गाडीच्या दोन्ही बाजूंनी मिळून एकूण 2 फेऱ्या होणार आहेत.

ट्रेन क्रमांक 07659 ही गाडी नांदेड येथून 12 आणि 14 सप्टेंबर (शनिवार आणि मंगळवार) रात्री 8:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3:30 वाजता सावंतवाडी रोड स्टेशनवर पोहोचेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक 07660 ही गाडी सावंतवाडी रोड येथून 14 आणि 17 सप्टेंबर (सोमवार आणि गुरुवार) सकाळी 7:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 वाजता नांदेडला पोहोचेल.

या विशेष ट्रेनमध्ये एकूण 24 डबे असतील. यामध्ये वातानुकूलित द्वितीय श्रेणी (2nd AC), वातानुकूलित तृतीय श्रेणी (3rd AC), स्लीपर क्लास, सामान्य द्वितीय श्रेणी आणि एस. एल. आर. (SLR) डब्यांचा समावेश आहे.

ही गाडी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक महत्त्वाची शहरे आणि पर्यटनस्थळे जोडणार आहे. दोन्ही दिशेने या गाडीला पूर्णा जंक्शन, परभणी जंक्शन, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, येडशी, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि कुडाळ या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना रत्नागिरी, चिपळूण, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे जाण्यासाठी आता थेट आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ