नागपुरात अतिक्रमणविरोधात मनपा-पोलीस एकत्र, रोज १०० किमी परिसर मोकळा करणार
नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मनपा आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांच्या बैठकीत अतिक्रमण हटवण्यासाठी संयुक्त मोहीम जाहीर.
नागपूर शहरात वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला आणि नागरिकांच्या सुरक्षेला अडचण होत असल्याने मनपा आणि पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील फुटपाथ, रस्त्याच्या कडेला, अनधिकृत बाजार आणि सार्वजनिक जागांवर वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर आता फक्त अतिक्रमण हटवण्यापुरती कारवाई न करता कठोर कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत. वारंवार नियम मोडणाऱ्यांविरोधात कॉग्निजेबल गुन्हा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दलच्या कायद्याखाली गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
रविवारी जिल्हा नियोजन भवनात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मनपा आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा-पोलिसांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत शहरातील अतिक्रमण नियंत्रण आणि गुन्हे रोखण्याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे मनपाच्या सर्व १० झोनमध्ये रोज १०-१० किलोमीटर परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जाणार आहे. याप्रमाणे संपूर्ण शहरात रोज साधारण १०० किलोमीटर परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण हटवून ते पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि मोकळे करावेत, असे त्यांनी सांगितले. रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची विशेष काळजी घेण्याचेही निर्देश देण्यात आले. यासोबतच शहरातील पार्किंग व्यवस्था आणि प्रमुख रस्ता चौकांसाठी प्रभावी ब्लू-प्रिंट तयार करण्यावरही भर देण्यात आला. ई-रिक्षा आणि ऑटो-रिक्षांसाठी ठराविक जागा निश्चित करणे तसेच रस्त्यांवर सिलेंडर ठेवून धोकादायक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले.
या संयुक्त मोहिमेअंतर्गत अनधिकृत बाजार, फुटपाथवरील कब्जा, अवैध विक्रेते, अतिक्रमण करणारे दुकानदार यांच्यासह वाहने मॉडिफाय करून त्यातून व्यवसाय करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. रस्ते आणि सार्वजनिक जागांवरील अशा अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतो आणि नागरिकांची सुरक्षाही धोक्यात येते, असे नागपूर जिल्हा प्रशासनाचे मत आहे.
शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील अवैध पानठेले आणि अतिक्रमणांविरोधात तातडीने आणि कडक कारवाई करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शैक्षणिक परिसराभोवती शिस्त राखण्यासाठी या भागाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
मात्र अतिक्रमण हटवण्याची कारवाई नियमांनुसारच केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आधी अनधिकृत विक्रेत्यांना नियमानुसार नोटीस देणे, त्यांची बैठक घेऊन कारवाईची माहिती देणे आणि संबंधित स्थानिक पोलीस स्टेशनशी समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मनपा आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांनी बैठकीत मनपाच्या मिशन १०० डे बाबत माहिती दिली. शहरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे, शहरी शिस्त प्रस्थापित करणे आणि नागरिकांचे जीवनमान सुधारणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. ही मोहीम आता नागपूर पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून पुढे नेली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. सुरुवातीच्या टप्प्यात शहरातील प्रमुख चौक, मोठे अवैध बाजार, फुटपाथ आणि मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांना लक्ष्य केले जाणार आहे.
या बैठकीला सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त मंगेश खवले यांच्यासह मनपाचे सर्व सहायक आयुक्त आणि पोलीस विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.