गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:39 IST

नागपूरच्या संविधान चौकात MPSC विरोधात विद्यार्थ्यांचा उद्रेक, हजारो तरुण रस्त्यावर

पेपरफुटीच्या घटनांनंतर विदर्भातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नागपूरच्या संविधान चौकात मोर्चा काढून पारदर्शक परीक्षा पद्धतीची मागणी केली.

नागपूरच्या संविधान चौकात MPSC विरोधात विद्यार्थ्यांचा उद्रेक, हजारो तरुण रस्त्यावर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

आपला हक्क, भविष्य आणि परीक्षा पद्धतीतील पारदर्शकता या मागण्यांसाठी बुधवारी संपूर्ण विदर्भातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी नागपूरच्या रस्त्यावर उतरले. नागपूरच्या ऐतिहासिक संविधान चौकात विदर्भातील हजारो तरुणांनी एकजूट दाखवत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

'विदर्भ स्पर्धा परीक्षा समन्वय समिती'च्या बॅनरखाली आयोजित या मोठ्या आंदोलनात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा आणि भंडारा या भागांतून विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

वर्षानुवर्षे कष्ट करून, आर्थिक अडचणी सोसून आणि घरापासून दूर राहून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भरवसा 'पेपरफुटी'च्या बातम्यांमुळे तुटतो, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याच संतापातून विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उमेदवारांनी संविधान चौकात MPSCच्या कारभाराविरोधात मोर्चा उघडला. सकाळी १० ते दुपारी २ या चार तासांच्या या जोरदार आंदोलनात विदर्भातील तरुणाईची ताकद दिसून आली.

अलीकडेच समोर आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात MPSCच्याच उपसचिव आणि सहायक कक्ष अधिकाऱ्याला अटक झाल्याने विद्यार्थ्यांचा संताप वाढला. गेल्या ८ वर्षांत ७ मोठ्या परीक्षांचे पेपर फुटले असून हा केवळ एका विभागाचा गोंधळ नसून संपूर्ण यंत्रणेचे अपयश असल्याचे आंदोलक म्हणाले.

MPSCची विश्वासार्हता पूर्णपणे संपली आहे, असे सांगत विद्यार्थ्यांनी आयोगात पारदर्शक आणि सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी तसेच सध्याचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह सर्व दोषींवर कडक कारवाई करून त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी केली.

या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळाला. नागपूर शहरातील ६० ते ७० स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेसनी बंद ठेवून आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला. क्लास चालक, मार्गदर्शक आणि शिक्षकही हजारो विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून संविधान चौकात उभे राहिले.

या आंदोलनात विदर्भाची सांस्कृतिक ओळख आणि इथली बोलीभाषा ठळकपणे दिसून आली. विद्यार्थ्यांनी अस्सल नागपुरी आणि वैदर्भीय शब्दसंग्रह वापरत आयोगाच्या निष्क्रियतेवर टीका केली. हातातील फलकांवर 'मारबत', 'बडगे', 'झामल झामल', 'तरी पोहा' आणि 'भैताड' अशा प्रचलित स्थानिक शब्दांचा वापर करून MPSCची खिल्ली उडवण्यात आली. या वेगळ्या आणि टोकदार पद्धतीने संपूर्ण आंदोलनाचे लक्ष वेधून घेतले.

आंदोलनाच्या समारोपाला समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. अतुल खोब्रागडे, अभिलाष वराडे, संजय रणदिवे, शैलेश तुमडे, खेमराज चमौशिकर, संघपाल निकोसे, प्रणय सातकर आणि अनिकेत माते यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेत त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. परीक्षा पद्धतीत तातडीने सुधारणा न झाल्यास आणि दोषींवर कडक कारवाई न झाल्यास विदर्भातून सुरू झालेले हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात अधिक तीव्र रूप धारण करेल, असा इशारा तरुणांनी दिला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ