रोहित पवार: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा
एमपीएससीच्या कारभाराविरोधात आणि कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा निघाला असता आ. रोहित पवार यांनी एमपीएससी अध्यक्षपदी सक्षम अधिकाऱ्याच्या नियुक्तीची मागणी केली.
एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शक व्हाव्यात यासाठी सरकारने समिती नेमली, याचे स्वागत आहे, पण नुसती समिती किंवा एसआयटी नेमून प्रश्न सुटणार नाही, असे आ. रोहित पवार यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरात सांगितले. एमपीएससीच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या कारभाराविरोधात आणि कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ गुरुवारी, ११ तारखेला हजारो विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात आक्रोश मोर्चा काढला होता. हा मोर्चा आमखास मैदानापासून सुरू झाला आणि विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. त्यानंतर दिल्लीगेट येथे या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेत विद्यार्थ्यांच्या काही प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. वर्ग 'क'ची परीक्षा नोव्हेंबरमध्येच व्हावी, ती परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जावी आणि मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, अशा या मागण्या होत्या.
रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. व्यासपीठावर उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थी नेत्यांनी एमपीएससीच्या कारभाराबाबतच्या आपल्या व्यथा उपस्थितांसमोर मांडल्या. जात, पक्ष आणि संघटनांचे मतभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांनी एकजुटीने लढा दिला तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यापूर्वीही अशा प्रकारचे मोर्चे निघाले होते, पुण्यात एकदा, छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनदा, तसेच सोलापूर आणि सातारा येथेही विद्यार्थ्यांनी मोर्चे काढले होते. उद्या म्हणजे शनिवारी लातूरमध्ये विद्यार्थ्यांचा आणखी एक आक्रोश मोर्चा निघणार असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली.
अनेक प्रकरणांत एसआयटी स्थापन झाली, पण वर्षानुवर्षे त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, हे वास्तव आहे, असे सांगत सरकारने एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना पवार म्हणाले की, माझ्याकडे काम नाही म्हणून मी पेपरफुटीवर बोलतो, अशी टीका माझ्यावर केली जाते, पण काही परीक्षांमध्ये पेपरफुटी झाल्याचे सरकारनेच मान्य केले आहे. वर्ग 'क'ची परीक्षा पुढे ढकलावी लागणे हे सरकारचे अपयश असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.