भायखळा ते जे.जे. मार्ग उड्डाणपुलाचे काम वेगात; प्रकल्पाची 22 टक्के प्रगती, मे 2028 पर्यंत पूर्ण होणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून भायखळा ते जे.जे. मार्ग दरम्यान उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला असून, अतिरिक्त आयुक्तांनी वेळेआधी काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत आणि एकसंध व्हावी, या हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले आहे. याच नियोजनाचा भाग असलेल्या भायखळा ते जे.जे. मार्ग उड्डाणपुलाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. भायखळ्यातील सीताराम सिलम उड्डाणपूल, म्हणजेच वाय ब्रिज, ते कुतुब-ए-कोंकण मखदूम अली माहिमी उड्डाणपूल म्हणजेच जे.जे. उड्डाणपूल यांना जोडणाऱ्या या मार्गावर काम चालू आहे. जे.जे. मार्ग आणि साबू सिद्दीकी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या जंक्शनवर हे बांधकाम होत आहे.
सर्वसमावेशक वाहतूक गतिशीलता आराखड्याअंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पात मुख्य केबल-स्टे पूल, वायाडक्ट आणि पूर्व-पश्चिम बाजूंना जोडणारे फ्लायओव्हर आर्म्स यांचा समावेश आहे. मुख्य केबल-स्टे पूल आणि वायाडक्टची रचना 2+2 लेनची असून केबल-स्टे भागाची लांबी साधारण 230 मीटर आणि वायाडक्टची लांबी 312 मीटर आहे. या भागाची रुंदी 16.5 मीटर आहे. डाव्या बाजूचा अप रॅम्प 205 मीटर बाय 5.25 मीटर, तर उजव्या बाजूचा अप रॅम्प 213 मीटर बाय 5.25 मीटर एवढा आहे. हे बांधकाम आरसीसी आणि स्ट्रक्चरल स्टेनलेस स्टील वापरून केले जात असून, त्यामुळे पुलाची मजबुती आणि टिकाऊपणा दीर्घकाळ टिकून राहील, असे सांगण्यात आले आहे.
मुख्य पुलाला जोडण्यासाठी पूर्व आणि पश्चिम बाजूला वेगळे फ्लायओव्हर आर्म्सही उभारले जात आहेत. हे आर्म्स 1+1 लेनचे असतील. पश्चिम बाजूच्या आर्मची लांबी सुमारे 290 मीटर, तर पूर्व बाजूच्या आर्मची लांबी सुमारे 350 मीटर आहे. दोन्ही बाजूंच्या आर्म्सची रुंदी 8.5 मीटर असून, त्यांच्यासाठीही आरसीसी आणि स्ट्रक्चरल स्टेनलेस स्टीलचाच वापर होणार आहे. केबल-स्टे पूल, वायाडक्ट आणि दोन्ही बाजूंचे फ्लायओव्हर आर्म्स एकत्र आल्यावर वेगवेगळ्या दिशांनी येणारी-जाणारी वाहतूक अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता येईल.
या पूल प्रकल्पासाठी पावसाळा वगळून 26 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, म्हणजेच मे 2028 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्या प्रकल्पाची भौतिक प्रगती 22 टक्के इतकी झाली आहे. निर्धारित वेळेआधी काम पूर्ण व्हावे यासाठी कामाचे नियोजन प्रभावी पद्धतीने करावे, आवश्यक तेवढे मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध ठेवावी आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये योग्य समन्वय राखावा, अशा सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत. नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.