गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
23:46 IST

मोरवा विमानतळ 'उडान' योजनेत येणार; मुनगंटीवार यांची दिल्लीत मागणी, मंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेऊन चंद्रपूरच्या मोरवा विमानतळाचा 'उडान' योजनेत समावेश करण्याची मागणी केली.

मोरवा विमानतळ 'उडान' योजनेत येणार; मुनगंटीवार यांची दिल्लीत मागणी, मंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याच्या हालचालींना नवी दिल्लीत वेग आला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेऊन मोरवा विमानतळाचा केंद्र सरकारच्या 'उडान' (उडे देश का आम नागरिक) योजनेत समावेश करावा आणि चंद्रपूरहून थेट प्रवासी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी केली. या मागणीला केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिले, त्यामुळे प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मुनगंटीवार यांनी चंद्रपूरहून पुणे, मुंबई आणि दिल्ली या शहरांसाठी नियमित हवाई सेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी केली. मोरवा विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक बाबींचा विचार करून चंद्रपूरसाठी नियमित हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले. यामुळे चंद्रपूरच्या हवाई संपर्काच्या मागणीला केंद्राच्या पातळीवर सकारात्मक दिशा मिळाल्याचे मुनगंटीवार यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

चंद्रपूर हा विदर्भातील औद्योगिक, खनिजसंपन्न आणि वनवैभवाने समृद्ध जिल्हा आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोळसा व इतर खनिजसंपत्ती असून सिमेंट उद्योग, बल्लारपूर पेपर मिल, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, धारिवाल, जीएमआर आणि वर्धा पॉवर यांसारखे महत्त्वाचे औद्योगिक व ऊर्जा प्रकल्प येथे कार्यरत आहेत. यासोबतच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर हे देश-विदेशातील पर्यटकांचे महत्त्वाचे आकर्षण ठरले आहे. उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि प्रशासकीय क्षेत्राचा वाढता विस्तार लक्षात घेता चंद्रपूरला थेट हवाई संपर्काची गरज असल्याचे मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

सध्या चंद्रपूरहून नियमित विमानसेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी, उद्योजक, व्यावसायिक, सरकारी अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना विमानप्रवासासाठी नागपूर किंवा अन्य शहरांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे प्रवासासाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च होतो. चंद्रपूरहून थेट विमानसेवा सुरू झाल्यास नागरिकांची ही गैरसोय दूर होईल आणि जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण व रोजगाराच्या संधींनाही चालना मिळू शकते.

चंद्रपूर शहरापासून सुमारे ९ किलोमीटर अंतरावर असलेला मोरवा विमानतळ सुमारे ६२ एकर परिसरात पसरलेला आहे. या विमानतळाची धावपट्टी सध्या सुमारे १ किलोमीटर लांबीची असून आवश्यक तांत्रिक निकषांनुसार तिचा विस्तार केल्यास नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. विमानतळाच्या दक्षिण-पूर्व आणि पश्चिम दिशेला वनविभागाची जमीन असून उत्तर दिशेला खासगी जमीन असल्याचेही मुनगंटीवार यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उंच बॉयलर्समुळे विमानतळाबाबत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींचा आजच्या आधुनिक विमान वाहतूक तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर पुनर्विचार करावा, अशीही मागणी मुनगंटीवार यांनी केली. या बाबींचा तांत्रिक अभ्यास करून व्यवहार्य मार्ग काढण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोरवा विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुनगंटीवार यांनी यापूर्वीही सातत्याने पाठपुरावा केला आहे. १५ ऑक्टोबर २०२५, १५ डिसेंबर २०२५ आणि २७ मार्च २०२६ रोजी त्यांच्या कार्यालयामार्फत या विषयावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नायडू यांची भेट घेऊन मुनगंटीवार यांनी निवेदन सादर केले.

मोरवा विमानतळाबाबत आवश्यक कार्यवाही करून चंद्रपूरसाठी नियमित हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या दीर्घकाळापासूनच्या हवाईसेवेच्या मागणीला केंद्राच्या पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, मोरवा विमानतळाच्या माध्यमातून चंद्रपूरला पुणे, मुंबई आणि दिल्लीशी जोडण्याच्या प्रयत्नांना आता अधिक बळ मिळाले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ