गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:24 IST

महिलांनी उद्योग-व्यवसायातून स्वतःच्या पायावर उभे राहावे : भेंडारकर यांचे आवाहन

गोरेगावात तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या वार्षिक सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचे महिलांना मार्गदर्शन.

महिलांनी उद्योग-व्यवसायातून स्वतःच्या पायावर उभे राहावे : भेंडारकर यांचे आवाहन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

महिलांनी नुसते बचत गटांपुरते मर्यादित न राहता उद्योग, व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले. शासनाच्या विविध योजना आणि उपलब्ध संधींचा लाभ घेऊन महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असेही ते म्हणाले.

गोरेगाव येथील गुरुकृपा लॉनवर ९ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला. महिला आर्थिक विकास महामंडळ, गोंदिया यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा' अंतर्गत तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र, गोरेगाव यांची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या उद्घाटनप्रसंगी भेंडारकर बोलत होते.

उपस्थित महिला भगिनींशी संवाद साधताना भेंडारकर यांनी तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्रामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, स्वयंरोजगार तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना आणि संधींचा प्रभावी वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ग्रामीण भागातील महिलांमध्ये कष्ट करण्याची क्षमता, जिद्द आणि कल्पकता मोठ्या प्रमाणात असल्याचे भेंडारकर यांनी सांगितले. या क्षमतेला योग्य प्रशिक्षण, बाजारपेठ आणि आर्थिक पाठबळ मिळाले तर महिला आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसोबतच गाव आणि परिसराच्या आर्थिक विकासातही महत्त्वाचे योगदान देऊ शकतात, असे ते म्हणाले. महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार झालेली आर्थिक ताकद ही केवळ कुटुंबाच्या विकासापुरती नसून सामाजिक परिवर्तनाचीही मोठी शक्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांनी एकजुटीने पुढे जाऊन स्वावलंबी, सक्षम आणि उद्योजक महिला म्हणून नवी ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्रामार्फत जास्तीत जास्त महिलांना उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा शुभेच्छाही भेंडारकर यांनी दिल्या.

या कार्यक्रमाला सी.एम.आर.सी.च्या अध्यक्ष नलिना डोंगरे, पंचायत समिती गोरेगावच्या सभापती चित्रलेखा चौधरी, जिल्हा परिषद सदस्य हनवंत वट्टी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, माजी उपसरपंच रविकांत तरोणे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, कृषी अधिकारी ललन राजपुत, नगरसेविका सुष्मा अगळे, माजी सभापती आरती चव्हान, सी.एम.आर.सी.च्या सचिव तेजेस्वरी चौरागडे, सहायक आयुक्त पशुविभाग गिरीष गभणे, आरोग्य विभागाचे प्रशांत मेश्राम, सी.एम.आर.सी.च्या व्यवस्थापक योगिता राउत यांच्यासह गीता खंडाईत, लक्ष्मी ठाकुर, नंदनी चाचेरे, माया काळसर्पे, रेखा शिवणकर, लता भोयर, सीमा रहांगडाले, ललिता लटैया, गुरवताई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ