नागपूर महावितरणची कठोर भूमिका, वाणिज्य संचालकांकडून स्मार्ट मीटर आणि शंभर टक्के वसुलीचे सक्त आदेश
नागपूर महावितरणचे वाणिज्य संचालक योगेश गडकरी यांनी नागपूर आणि अमरावती परिमंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्वेध सेवा, तोटा रोखणे आणि शंभर टक्के बिल वसुली या तीन उद्दिष्टांवर काम करण्याचे निर्देश दिले.
नागपूर महावितरणचे वाणिज्य संचालक योगेश गडकरी यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तीन उद्दिष्टे समोर ठेवून मिशन मोडमध्ये काम करण्याचे निर्देश दिले आहेत. निर्वेध आणि दर्जेदार सेवा देणे, वितरण तसेच वाणिज्यिक तोटा पूर्णपणे रोखणे आणि पाठवलेल्या वीज बिलांची शंभर टक्के वसुली करणे, अशी ही तीन उद्दिष्टे आहेत. ग्राहकांना उत्तम सेवा मिळावी, हा यामागचा हेतू असल्याचे सांगण्यात आले.
नागपूरच्या विद्युत भवन कार्यालयात नागपूर आणि अमरावती परिमंडळाची संयुक्त उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीत गडकरी यांनी हे निर्देश दिले. ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करावे आणि बरोबर वीज बिल पाठवावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या. ज्या ठिकाणी मीटरचे रीडिंग मिळत नाही किंवा मीटर खराब आहेत, अशा ठिकाणी ते मीटर तातडीने बदलून त्या जागी अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नव्या तंत्रज्ञानाबाबत ग्राहकांच्या मनात असलेल्या शंका आणि गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून जनजागृती करावी, असे गडकरी यांनी सांगितले.
वीज वितरण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि नागपूर महावितरणचा महसूल वाढवण्यासाठी आता आक्रमक पावले उचलली जाणार आहेत. वीज बिल न भरणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार तोडण्याचे निर्देशही गडकरी यांनी दिले. त्याचबरोबर वीज चोरीमुळे होणारे मोठे नुकसान रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम अधिक वेगाने राबवण्यास त्यांनी सांगितले.
ज्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत आणि थकबाकीमुळे त्यांचा वीजपुरवठा स्वयंचलित प्रणालीने बंद झाला आहे, तरीही असे ग्राहक बिल भरत नाहीत, अशा प्रत्येक ग्राहकाच्या घरी प्रत्यक्ष जाऊन तपासणी करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. अशा तपासणीत अनधिकृत वीज वापर किंवा वीज चोरी आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला मुख्य अभियंता मंगेश कोहाट, अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंता स्वप्निल गोतमारे आणि अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्यासह दोन्ही परिमंडळांचे सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक आणि नागपूर परिमंडळाच्या विविध विभागांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.