शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:34 IST

महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा शिक्षक-विद्यार्थी गौरव सोहळा, ३५० शिक्षकांचे समायोजन होणार

रायगड जिल्हा परिषदेतर्फे प्रथमच दक्षिण रायगडातील महाडमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा होणार असून, यासोबतच शिक्षकांचे समायोजन आणि शाळांमध्ये सौरऊर्जा यंत्रणा उभारण्याबाबतही निर्णय जाहीर करण्यात आले.

महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा शिक्षक-विद्यार्थी गौरव सोहळा, ३५० शिक्षकांचे समायोजन होणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी होणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यंदा प्रथमच दक्षिण रायगडातील ऐतिहासिक महाड नगरीत होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या नाट्यगृहात गुरुवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे यांनी मंगळवारी महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या सोहळ्यात जिल्ह्यातील १६ आदर्श शिक्षकांचा तसेच ३२२ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे. याशिवाय, जिल्हा परिषदेला विविध उपक्रमांमध्ये सहकार्य करणाऱ्या संस्थांचाही आगामी काळात गौरव करण्यात येणार असल्याचे कळंबे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न सोडवण्यासाठी येत्या काही दिवसांत ३५० हून अधिक शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. यामध्ये दक्षिण रायगडातील रिक्त पदांना प्राधान्य दिले जाईल, असे कळंबे यांनी स्पष्ट केले. महाडमधील रिक्त असलेल्या १२५ पदांपैकी जवळपास १०० पदे या समायोजन प्रक्रियेतून भरली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

यासोबतच १२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सुमारे १२०० भजनी मंडळांना महाडमध्ये भजन साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. बंद पडलेला रायगड भूषण पुरस्कार पुन्हा सुरू करून त्याचा कार्यक्रम महाडमध्ये घेण्याबाबतही विचार सुरू असल्याचे कळंबे म्हणाले.

शाळांच्या वीज बिलांबाबत बोलताना कळंबे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शाळांना सध्या व्यावसायिक दराने वीज बिल आकारले जात आहे. याबाबत शासनाशी चर्चा सुरू असून, जिल्ह्यातील १०० हून अधिक शाळांमध्ये सौरऊर्जा यंत्रणा उभारण्याला प्राधान्य देण्याचा विचार जिल्हा परिषदेने सुरू केला आहे.

महाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनात झालेल्या या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य निलेश ताटरे, स्थानिक प्रभारी गटशिक्षणाधिकारी राजन सुर्वे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

कळंबे यांनी सांगितले की, रायगड जिल्हा परिषदेचे बहुतांश कार्यक्रम आतापर्यंत अलिबाग, पेण आणि पनवेल परिसरात होत होते. पालकमंत्री भरत गोगावले यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील महत्त्वाचे कार्यक्रम दक्षिण रायगडात, विशेषतः ऐतिहासिक महाडमध्येही आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना कळंबे म्हणाले की, मैदानी स्पर्धांदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि होणारे अपघात यावर आगामी काळात उपाययोजना केल्या जातील. तसेच बंद झालेला क्रीडा निधी पुन्हा सुरू करण्याबाबतही शासनस्तरावर विचार केला जाईल. शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, धान्यपुरवठ्यात अयोग्य प्रकार आढळल्यास संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ