गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:24 IST

आगीचा धोका टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेचा कायापालट, रुग्ण सुरक्षिततेसाठी पालिकेचे महत्त्वाचे पाऊल

केईएम रुग्णालयातील मुख्य इमारतीची जुनी विद्युत यंत्रणा बदलण्यासाठी पालिकेने सुमारे १० कोटी ३० लाख रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे.

आगीचा धोका टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेचा कायापालट, रुग्ण सुरक्षिततेसाठी पालिकेचे महत्त्वाचे पाऊल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

परळ भागातील राजे एडवर्ड स्मारक म्हणजेच केईएम रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक मोठे पाऊल टाकले आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील विद्युत यंत्रणा आता जुनी आणि धोकादायक झाल्याने ती पूर्णपणे बदलण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी सुमारे १० कोटी ३० लाख ८७ हजार ७५० रुपये खर्चाचा सुधारित प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी स्थायी समिती आणि स्थापत्य समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

ही खबरदारी घेण्यामागे काही गंभीर घटना कारणीभूत ठरल्या आहेत. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी केईएम रुग्णालयातच विजेच्या अपघातात प्रिन्स राजभर या बालकाचा मृत्यू झाला होता. याशिवाय दहिसर जकात नाका येथील उपचार केंद्र, तसेच ठाणे आणि भंडारा येथील रुग्णालयांमध्ये यापूर्वी घडलेल्या आगीच्या दुर्घटनांचाही या निर्णयामागे संदर्भ आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने रुग्णालयातील विद्युत यंत्रणा पूर्णपणे बदलण्याचे ठरवले आहे, जेणेकरून भविष्यात असे अपघात टळावेत.

या कामाचा प्रत्यक्ष कंत्राट खर्च ९ कोटी ३७ लाख १६ हजार १३६ रुपये निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये १० टक्के पर्यवेक्षण खर्च मिळवल्यानंतर एकूण अंदाजित खर्च १० कोटी ३० लाख ८७ हजार ७५० रुपयांवर पोहोचतो. सन २०२६-२७च्या सुधारित अर्थसंकल्पात या कामासाठी लागणारी रक्कम राखून ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर लगेच काम सुरू करता येईल.

केईएम रुग्णालय हे १८०० खाटा असलेले मुंबईतील एक प्रमुख वैद्यकीय केंद्र आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय दुर्मीळ आजार धोरण २०२१ अंतर्गत देशभरात नेमलेल्या आठ उत्कृष्टता केंद्रांपैकी हे एक केंद्र आहे. दरवर्षी सुमारे १८ लाख बाहेररुग्ण आणि ८५ हजार आंतररुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात. सुमारे ३९० डॉक्टर, ५५० निवासी डॉक्टर तसेच वैद्यकीय विद्यार्थी आणि इतर कर्मचारी येथे चोवीस तास काम करत असतात. एवढ्या मोठ्या आणि गजबजलेल्या ठिकाणी शॉर्टसर्किटसारख्या घटना टाळण्यासाठी हा प्रस्ताव लवकरच मंजूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रुग्णालयात आग प्रतिबंधक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच शासकीय सुरक्षा मानकांचे पालन करण्यासाठी पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे. या कामासाठी पालिकेने मागवलेल्या संगणकीय निविदा प्रक्रियेत चार पुरवठादारांनी सहभाग घेतला होता. यातील दोन पात्र निविदाकारांपैकी मेसर्स एलिप्रोज इंजिनीअर्स या कंपनीने पालिकेच्या कार्यालयीन अंदाजापेक्षा १.९३ टक्के कमी दराची निविदा दिल्याने या कामासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ