कांदा उत्पादकांच्या थकीत पैशांसाठी शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन
शिरूर तालुक्यातील तांदळीच्या शेतकऱ्यांचे कर्नाटकातील एपीएमसी व्यापाऱ्यांकडे दोन कोटींहून अधिक रुपये अडकले असून, शरद पवार यांनी यासाठी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी संपर्क साधला.
बारामती : शिरूर तालुक्यातील तांदळी गावातील काही शेतकऱ्यांनी कर्नाटकातील एपीएमसी मार्केटमध्ये कांदा विकला होता, पण त्याचे पैसे अजूनही त्यांच्या हातात पडलेले नाहीत. या शेतकऱ्यांची तब्बल दोन कोटी चोवीस लाख पंच्याण्णव हजार एकशे एकवीस रुपयांची रक्कम कर्नाटकातील व्यापाऱ्यांकडे थकीत आहे. ही रक्कम मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.
नानासो बाबासो कळसकर, नवनाथ खशाबा थोरात, गोरख गणपत गदादे आणि गणेश गणपत गदादे या चार शेतकऱ्यांचे हे पैसे कर्नाटकातील एपीएमसीमधील व्यापाऱ्यांकडे अडकून पडले आहेत. कांदा विकूनही मोठी रक्कम हातात न आल्याने या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शेतकऱ्यांची ही अडचण कृषिभूषण प्रल्हाद वरे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी थेट शरद पवार यांची भेट घेतली. कर्नाटकातील व्यापाऱ्यांकडे अडकलेले कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना परत मिळावेत यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती त्यांनी पवार यांना केली.
ही विनंती ऐकून घेतल्यावर पवार यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आणि लगेचच कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दूरध्वनी केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे पैसे कर्नाटकातील एपीएमसी व्यापाऱ्यांकडे थकीत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आणि शेतकऱ्यांना ही रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केली.
याआधीही पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या एका भेटीत या प्रकरणासंदर्भात इंग्रजी भाषेतून एक पत्र दिले होते. याच दरम्यान नानासाहेब कळसकर आणि त्यांचे सहकारी शेतकरी बेंगळुरूच्या एपीएमसी मार्केटमध्ये गेले असता तिथे त्यांची मुख्यमंत्री शिवकुमार यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. त्यावेळी कळसकर यांनी पवार यांनी दिलेले तेच पत्र मुख्यमंत्र्यांना दाखवले.
पत्रातील मजकूर वाचल्यानंतर शिवकुमार यांनी शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. तसेच, महाराष्ट्रातून शरद पवार यांनी याबाबत स्वतः फोन केल्याचेही त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
मोठा खर्च करून, प्रतिकूल परिस्थितीत मेहनत घेऊन कांदा पिकवणाऱ्या या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे पेमेंट रखडणे ही गंभीर बाब आहे. आता पवार यांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण लवकर मार्गी लागेल आणि थकीत रक्कम लवकरच मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
"आमच्या कष्टाच्या पैशांसाठी पवार साहेबांनी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. त्यामुळे आमचा प्रश्न आता मार्गी लागेल आणि थकीत कांदा पेमेंट लवकर मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे," अशी भावना नानासाहेब कळसकर आणि त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.