गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:20 IST

टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टला ग्रामस्थांचा विरोध; आंबोटपाठोपाठ भालीवडीतही जागेची मोजणी रद्द

कर्जत तालुक्यातील सायडोंगर येथील टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टसाठी रस्त्याची मोजणी करण्यास आंबोटपाठोपाठ आता भालीवडी गावातील शेतकऱ्यांनीही विरोध केला.

टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टला ग्रामस्थांचा विरोध; आंबोटपाठोपाठ भालीवडीतही जागेची मोजणी रद्द छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कर्जत तालुक्यातील सायडोंगर येथे येऊ घातलेल्या टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रोजेक्टसाठी बनवण्यात येणाऱ्या रस्त्याची मोजणी दुसऱ्यांदा स्थानिक शेतकऱ्यांनी उधळून लावली आहे. काही दिवसांपूर्वी आंबोट गावातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जमिनीची मोजणी करू न देता परत पाठवले होते. त्याच घटनेची पुनरावृत्ती आज भालीवडी गावात झाली, जिथे ग्रामस्थांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना जमिनीची मोजणी करू दिली नाही.

टोरंट एनर्जी सोल्युशन पॉवर प्रोजेक्ट या कंपनीकडून कर्जत तालुक्यातील सायडोंगर येथे हायड्रॉलिक प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ पातळीवरून या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्याचे बोलले जात आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मंजुरीच्या पार्श्वभूमीवरच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने सायडोंगर ते भालीवडी असा 5.900 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवण्यासाठी अधिसूचना काढली आहे.

या रस्त्यासाठी भालीवडीपासून आंबोट, पाली, पोटल आणि सायडोंगर या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्याच्या दृष्टीने ही अधिसूचना काढण्यात आली आहे. त्याचबरोबर हुमगाव ते सायडोंगर असा आणखी एक रस्ता प्रस्तावित आहे. भालीवडी ते सायडोंगर या रस्त्यासाठी कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने जमिनीची मोजणी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य सरकारने दिले होते. या आदेशानुसार बांधकाम खात्याचे उप अभियंता राहुल देवांग यांच्याकडून रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मात्र या हायड्रॉलिक प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. काही दिवसांपूर्वी टोरंट कंपनीने आंबोट गावातील जमिनीतून संभाव्य रस्ता नेण्याचे ठरवले होते. त्या जागेची मोजणी करण्यासाठी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पोहोचले असता, तेथील ग्रामस्थांनी एकजुटीने मोजणीला विरोध केला. त्यामुळे बांधकाम खात्याला त्या वेळी जमिनीची मोजणी करता आली नव्हती.

त्यानंतर आज भालीवडी येथे बांधकाम खात्याचे उप अभियंता राहुल देवांग आणि शाखा अभियंता मोजणीसाठी पोहोचले, तेव्हा काही मिनिटांतच भालीवडी गावातील ग्रामस्थ तेथे जमा झाले. मयुर पाटील या शेतकऱ्याने "आमच्या जमिनीत तुम्ही आलेच कसे?" असा थेट सवाल करत अधिकाऱ्यांनी जमिनीतून निघून जावे अशी ठाम भूमिका मांडली. त्यानंतर तेथे उपस्थित असलेले अनेक शेतकरी पुढे सरसावले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना जमिनीची मोजणी करू दिली नाही.

अशाप्रकारे भालीवडीपासून सुरू होणाऱ्या टोरंट कंपनीच्या रस्त्याच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच स्थानिकांनी तीव्र विरोध केल्याने, या रस्त्यासाठी आवश्यक असलेली जमीन प्रत्यक्षात मिळणार का, हा प्रश्न आता उभा राहिला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ