इन्स्टंट ई-पॅन: आधार लिंक असेल तर मोबाईलवरून 10 मिनिटांत मोफत पॅन कार्ड
आयकर विभागाच्या इन्स्टंट ई-पॅन सुविधेमुळे एजंटकडे न जाता, एक रुपयाही खर्च न करता घरबसल्या पॅन कार्ड काढता येतं.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पॅन कार्ड हे आता प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक अत्यावश्यक कागदपत्र बनलंय. बँकेत खातं उघडायचं असो, पैसे ट्रान्सफर करायचे असो किंवा कुठलाही मोठा व्यवहार करायचा असो, पॅन कार्डशिवाय काम अडतं. आधीच्या काळात पॅन कार्ड काढणं म्हणजे एक मोठी कटकट असायची. फॉर्म भरा, झेरॉक्स जोडा, सरकारी ऑफिसच्या रांगेत उभं राहा आणि अख्खा दिवस खर्च करा. पण आता ही सगळी डोकेदुखी संपली आहे, कारण आयकर विभागाने 'इन्स्टंट ई-पॅन' नावाची सुविधा सुरू केली आहे.
या सुविधेमुळे मोबाईलवरून फक्त 10 मिनिटांत पॅन कार्ड काढता येतं, तेही एक रुपयाही न भरता. पूर्वी लोक एजंटकडे जाऊन 300 ते 400 रुपये मोजायचे. पण आता तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल, तर तुम्ही स्वतःच काही मिनिटांत हे काम पूर्ण करू शकता. हे ई-पॅन कार्ड सामान्य प्लास्टिकच्या पॅन कार्डसारखंच सगळीकडे वापरता येतं, मग ते सरकारी काम असो किंवा प्रायव्हेट. डिजिटल इंडिया मोहिमेमुळेच ही सोय शक्य झाली असून लोकांना त्रास होऊ नये म्हणून आयकर विभागाने ही सुविधा सुरू केली आहे.
ही योजना पूर्णपणे पेपरलेस आहे. कुठलेही कागदपत्र जमा करायची गरज नाही, सायबर कॅफेत जायचीही गरज नाही. फक्त एक स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन असलं की काम होतं आणि यासाठी एकही रुपया खर्च करावा लागत नाही. अधिक माहितीसाठी incometax.gov.in या सरकारी संकेतस्थळावर जाऊन बघता येतं.
मात्र हे कार्ड काढण्यापूर्वी काही अटी लक्षात घेणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे आणि त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे, कारण त्याच नंबरवर OTP पाठवला जातो. तुमच्याकडे आधीपासून पॅन कार्ड नसावं, कारण दोन पॅन कार्ड बाळगणं हा गुन्हा असून त्यासाठी 10 हजार रुपये दंड होऊ शकतो. लहान मुलांना ही सुविधा वापरता येत नाही आणि ज्यांच्या आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख नमूद नाही, त्यांनाही ही सुविधा मिळणार नाही. मोबाईलवरून पॅन कार्ड काढण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी मोबाईलमध्ये incometax.gov.in ही वेबसाईट उघडायची. होमपेजवर 'Quick Links' या भागाखाली 'Instant e-PAN' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर उघडणाऱ्या नव्या पानावर 'Get New e-PAN' या बटणावर दाबायचं. मग 12 अंकी आधार क्रमांक टाकून खालच्या 'I confirm' या पर्यायावर टिक करून 'Continue' करायचं. आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP येतो, तो टाकल्यानंतर फोटो, नाव, जन्मतारीख आणि पत्ता आपोआप स्क्रीनवर दिसतो. ही माहिती एकदा तपासून सबमिट केली की काम पूर्ण होतं.
या प्रक्रियेनंतर एक Acknowledgement नंबर मिळतो आणि अवघ्या 10 मिनिटांत पॅन कार्ड तयार होतं. तेच त्याच वेबसाईटवरून PDF स्वरूपात डाउनलोड करता येतं. हे डिजिटल पॅन कार्ड 100 टक्के वैध असतं. आयकर विभागाने स्वतः स्पष्ट केलं आहे की या ई-पॅनवर डिजिटल सही असते आणि ते मूळ पॅन कार्डसारखंच सगळीकडे चालतं. ज्यांना प्लास्टिकचं कार्ड घरपोच हवं असेल, त्यांनी NSDL किंवा UTIITSL च्या संकेतस्थळावर जाऊन फक्त 50 रुपये भरून ते मागवता येतं, जे पोस्टाने घरी पोहोचवलं जातं.