हायड्रोजन ट्रेनपासून अणुऊर्जेपर्यंत, मोदींनी मांडला भारताचा हरित विकासाचा आराखडा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताच्या पर्यावरणीय कामगिरीचा लेखाजोखा मांडला आणि स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रातील पुढच्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 'द फ्यूचर ऑफ एन्व्हायर्न्मेंट अँड क्लायमेट डायनॅमिक्स' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत भाषण करताना भारताने पर्यावरणाच्या क्षेत्रात केलेल्या कामाचा तपशीलवार आढावा घेतला. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर देशाची पुढची दिशा काय असेल, हेही त्यांनी या भाषणातून स्पष्ट केलं. स्वच्छ वाहतूक आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या क्षेत्रांमध्ये भारत झपाट्याने पुढे जात असल्याचं मोदी यांनी नमूद केलं.
"काही दिवसांपूर्वीच भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन धावली असून, ती जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन आहे. स्वच्छ वाहतुकीच्या एका नव्या पर्वाची ही सुरुवात आहे," असं मोदी यांनी सांगितलं.
गेल्या १२ वर्षांत देशाची पवनऊर्जा क्षमता तिप्पट झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. जलविद्युत क्षमतेतही याच काळात मोठी वाढ झाली आहे. आता नवा भारत अणुऊर्जेवरही भर देत असून, या सगळ्या क्षेत्रांमध्ये खासगी कंपन्यांना संधी उपलब्ध करून दिली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रयत्नांमुळे देशाच्या बिगर-जीवाश्म ऊर्जा क्षमतेत ४०० टक्क्यांनी वाढ झाल्याचं ते म्हणाले.
ई-मोबिलिटीबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, २०१४ पूर्वी भारतात दरवर्षी अवघी ३,००० ई-वाहनं विकली जात होती. गेल्या वर्षी हा आकडा जवळपास २५ लाखांवर पोहोचला, जी खूप मोठी झेप आहे आणि यातून पर्यावरण रक्षणालाही हातभार लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. फास्टॅगमुळे टोल नाक्यांवर लागणारा वेळ आणि इंधनाची होणारी नासाडी लक्षणीयरीत्या कमी झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. २०१४ पर्यंत देशात केवळ पाच शहरांत २५० किमीपेक्षा कमी लांबीचं मेट्रो नेटवर्क होतं, पण आज २० पेक्षा जास्त शहरांत मेट्रोचा विस्तार झाला असून, एकूण १,००० किमीपेक्षा जास्त लांबीच्या मेट्रो नेटवर्कसह भारताने जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केल्याचं ते म्हणाले.
रेल्वेच्या १०० टक्के विद्युतीकरणामुळे लाखो लिटर डिझेलची बचत झाली असून, त्याचा फायदा पर्यावरणालाही झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. देशाचा विकास वेगवान आणि शाश्वत अशा दोन्ही अंगांनी होत असल्याचं ते म्हणाले. जलसंधारणाच्या क्षेत्रातही सध्या मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरात ७०,०००हून अधिक अमृत सरोवरं बांधण्यात आली असून, 'कॅच द रेन' म्हणजेच पावसाचं पाणी साठवण्याच्या मोहिमेअंतर्गत जवळपास १.५ कोटी जलसंधारण संरचना उभारण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं.
नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय अभियानामुळे मोठा बदल घडून आल्याचं मोदी म्हणाले. १२.५ लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचे समूह तयार करण्यात आले असून, हवामानाला अनुकूल अशा जवळपास ३,००० पीक-जाती विकसित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कृषी-वनीकरणाला चालना देऊन देशाचा कार्बन फूटप्रिंट कमी केला जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या १२ वर्षांत देशातील घनदाट जंगलक्षेत्रात २२ टक्क्यांनी वाढ झाल्याचंही ते म्हणाले.
प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर बोलताना मोदी म्हणाले की, याच कारणामुळे भारताने एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. 'कमी वापरा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा' या मंत्राच्या आधारे चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना दिली जात असून, आज देशात दररोज हजारो टन कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गोवर्धन योजनेच्या माध्यमातून गावागावांतील शेण आणि इतर सेंद्रिय कचऱ्याचंही उपयुक्त संसाधनांत रूपांतर केलं जात असल्याचं मोदी यांनी शेवटी नमूद केलं.