मटका किंगच्या गाडीतून ठाणेदाराने केला बस चालकाचा पाठलाग, डोक्यात काठी घालून मारहाण
ब्रम्हपुरीचे तत्कालीन ठाणेदार सुधाकर अंभोरे यांच्याविरुद्ध कोर्टाच्या आदेशाने गुन्हा नोंदवण्याचा मार्ग मोकळा, प्रकरण वणीच्या मटका किंगच्या गाडीशी जोडलं गेल्याने खळबळ.
ब्रम्हपुरीत एका बस चालकाला खाजगी कपड्यातल्या एका माणसाने शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आणि नंतर तोच माणूस चक्क तिथला ठाणेदार निघाला, अशी घटना समोर आली आहे. या प्रकरणी न्यायालयानेच आता गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ही घटना २६ नोव्हेंबर २०२३ रोजीची आहे. नागपूरचे ट्रॅव्हल्स चालक मोहन शालीकराम अडिवकर हे नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन गडचिरोलीहून नागपूरकडे निघाले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास ब्रम्हपुरी रेल्वे फाटक बंद असल्यामुळे गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. फाटक उघडल्यावर गाड्या हळूहळू पुढे सरकत असताना एक आकाशी रंगाची इनोव्हा गाडी (MH-29-AR-8855) रॉंग साईडने वेगात आली. त्या गाडीतून साध्या कपड्यात उतरलेल्या एका माणसाने चालक मोहन अडिवकर यांना शिवीगाळ करत थांबण्याचा इशारा केला. गर्दी खूप असल्याने अडिवकर यांनी फक्त "मी का थांबू?" असं म्हटलं, आणि तेवढ्यावरूनच तो माणूस चिडून तिथून निघून गेला.
पण प्रकरण तिथेच थांबलं नाही. बस पुढे ख्रिस्तानंद रुग्णालय चौकात पोहोचल्यावर तोच माणूस आधीच तिथे उभा होता. मोहन बसमधून उतरत असताना त्याने त्यांच्यावर धावून जाऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. एवढंच नाही, तिथे उभ्या असलेल्या फिरोज पठाण या वाहतूक पोलिसाची काठी हातात घेऊन त्याने मोहन यांच्या पायावर आणि डोक्यावर सपासप वार केले. मारहाण इतकी जबरदस्त होती की मोहन यांच्या डोक्यातून रक्त वाहायला लागलं. नंतर उघड झालं की मारहाण करणारा हा दुसरा कोणी नसून ब्रम्हपुरीचे ठाणेदार सुधाकर अंभोरे हेच होते. डोक्याला गंभीर दुखापत झालेले मोहन उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ द्या अशी विनवणी करत होते, पण अंभोरे यांनी प्रवाशांना बसमधून उतरवून रक्ताने माखलेल्या अवस्थेतच मोहन यांना बस चालवत पोलीस स्टेशनला आणायला भाग पाडलं.
पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर मोहन यांची दारू पिल्याच्या संशयावरून घेतलेली ब्रेथ टेस्ट निगेटिव्ह आली. एका वाहतूक पोलिसाने मोहन यांच्या मोबाईलमधलं घटनेचं रेकॉर्डिंग आणि फोटो लॉक नंबर जबरदस्तीने घेऊन डिलीट केले. उपचारासाठी खाजगी सेंटरमध्ये नेल्यावर सिटी स्कॅनचे २५०० रुपयेही चालकालाच भरावे लागले.
रात्री हा सगळा प्रकार घडल्यानंतर घाबरलेले मोहन तक्रार द्यायला ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये गेले. पण तिथे ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोळे आणि प्रशांत खोब्रागडे यांनी स्वतःच्या वरिष्ठाला, म्हणजे ठाणेदार अंभोरे यांना वाचवण्यासाठी लेखी तक्रार घ्यायलाच नकार दिला. अखेर मोहन यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी तसंच माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दाद मागितली. या सगळ्या प्रकरणात एक धक्कादायक गोष्ट समोर आली - घटनेच्या दिवशी ठाणेदार अंभोरे ज्या इनोव्हा गाडीतून चालकाचा पाठलाग करत आले होते, ती गाडी वणी (जि. यवतमाळ) येथील एका ओळखीच्या वरली-मटका किंगची असल्याची चर्चा परिसरात रंगली होती.
पोलीस प्रशासनाने स्वतःच्याच अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्यावर पीडित चालकाने वकिलामार्फत न्यायालयात दाद मागितली. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, ब्रम्हपुरी यांनी या अर्जाची गंभीर दखल घेत फौजदारी अर्ज क्रमांक २८/२०२४ अंतर्गत हा अर्ज मंजूर केला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) कलम १५६(३) अन्वये तत्कालीन ठाणेदार सुधाकर अंभोरे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या २९४, ३२४, ३४१, ५०४ आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या १४५(२) कलमांखाली गुन्हा नोंदवून सखोल तपास करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत.