Gondhal Oscars : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'गोंधळ'च्या संपूर्ण टीमला दिल्या शुभेच्छा
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी, 'गोंधळ' सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड
मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मोठी आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. संतोष डावखर दिग्दर्शित 'गोंधळ' या मराठी सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने तब्बल 33 चित्रपटांमधून 'गोंधळ'ची निवड केली आहे. या निवडीमुळे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत आनंदाचं वातावरण आहे.
गेल्या वर्षी 'धुरंधर' हा सिनेमा प्रचंड गाजला होता, आणि त्याच्या कथेमुळे तोच सिनेमा ऑस्करला जाणार असा अंदाज होता. पण काल 'गोंधळ' या मराठी सिनेमाने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत थेट ऑस्करपर्यंत मजल मारली. यासाठी दिग्दर्शक संतोष डावखर यांचं विशेष कौतुक होतंय. महाराष्ट्राची लोकपरंपरा आणि सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचं नातं सांगणारा हा सिनेमा असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याचं कौतुक केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून 'गोंधळ'च्या संपूर्ण टीमला ऑस्करसाठी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेशी आणि संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या या सिनेमाची निवड केली असून, आता हा सिनेमा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली ही कथा आता जागतिक स्तरावर नवी उंची गाठत आहे. सीएमओ महाराष्ट्रच्या ट्विटर अकाउंटवरूनही 18 सप्टेंबर 2026 रोजी "मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण!" असं म्हणत ही माहिती शेअर करण्यात आली.
'गोंधळ' चित्रपटाची कथा संतोष डावखर यांनी स्वतः लिहिली असून त्यांनीच याचं दिग्दर्शनही केलं आहे. भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक श्रीमंती आपल्या सिनेमाच्या कथानकात यावी, हा त्यांचा उद्देश होता. भारताला एक श्रीमंत आणि अभिमानास्पद संस्कृती लाभली असून, सिनेमाच्या माध्यमातून त्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व सादर करायचं होतं असं संतोष डावखर म्हणाले.
सिनेमात मानसशास्त्रीय आणि सांस्कृतिक थरार दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कथा सुमन नावाच्या नवविवाहित तरुणीभोवती आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक धार्मिक-सांस्कृतिक विधी असणाऱ्या 'गोंधळ' या पार्श्वभूमीवर फिरते. सुमनचं लग्न आनंदसोबत झालेलं असतं, पण लग्नानंतर तिच्या आयुष्यात एक अनपेक्षित आणि दुःखद वळण येतं. सिनेमात माणसाच्या मनातली भीती, अस्वस्थता, मानसिक संघर्ष आणि नात्यांमधली गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. पारंपरिक 'गोंधळ' विधीचा वापर केवळ देखावा म्हणून न करता, तो कथेच्या आशयाशी आणि भावनांशी जोडण्यात आला आहे.