गोंदिया जिल्हा परिषदेकडून हिंदी शाळा मराठी माध्यम दाखवल्याने टीईटी उमेदवार संतप्त
पवित्र पोर्टलवरील चुकीच्या नोंदणीमुळे हिंदी माध्यमाच्या टीईटी पात्र उमेदवारांच्या जागा घटल्याचा आरोप, न्यायालयात जाण्याचा इशारा.
राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून टीईटी पात्र उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती सुरू आहे. मात्र गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर हिंदी माध्यमाच्या शाळांची नोंद मराठी माध्यम म्हणून केल्याचा आरोप पीडित उमेदवारांनी केला आहे. यामुळे हिंदी माध्यमाच्या शाळांमधील जागांवर मराठी माध्यमाच्या उमेदवारांना संधी मिळाली आणि हिंदी माध्यमातून टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांवर अन्याय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत मंत्रालय पातळीवर पाठपुरावा सुरू असून, पुढे न्यायालयात दाद मागण्याची तयारी पीडितांनी दर्शवली आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती सुरू आहे. यासाठी सर्व जिल्हा परिषदांकडून आपापल्या जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त पदांची माहिती मागवण्यात आली होती, आणि ही अचूक माहिती पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षण विभागाची होती. मात्र गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नियम डावलून हिंदी माध्यमाच्या शाळांना मराठी माध्यम म्हणून दाखवले, असा आरोप आहे. यामुळे हिंदी माध्यमाच्या जवळपास ९५ जागा कमी झाल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. दरम्यान, राज्य सरकारने टीईटी पात्र उमेदवारांची शिक्षक पदावर निवडही केली आहे.
उपलब्ध जागांनुसार राज्याच्या शिक्षण विभागाने निवड यादी जाहीर केली. गोंदिया जिल्ह्यात हिंदी माध्यमाच्या शाळा मराठी माध्यम म्हणून दाखवल्या गेल्याने त्या जागांवर मराठी आणि बंगाली माध्यमाच्या उमेदवारांना शिक्षक म्हणून संधी मिळाली, असा आरोप आज (ता. १६) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पीडित उमेदवारांनी केला. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. शिक्षण आयुक्तांनी गोंदिया जिल्ह्याला भेट दिली तेव्हाही ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र गेल्या आठ दिवसांपासून गोंदियाचा शिक्षण विभाग ही चूक शासनाच्या निदर्शनास आणून देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आणि दिवस ढकलण्याचे धोरण अवलंबत पवित्र पोर्टलच्या उमेदवारांना कार्यशाळेच्या माध्यमातून पदस्थापना देत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला. जिल्हा परिषदेच्या या चुकीमुळे अन्याय झाल्याचे सांगत, पुढील काळात जिल्हा परिषद व शिक्षण विभागाविरुद्ध न्यायालयात दाद मागू किंवा मोठे आंदोलन करू, असा इशारा ललितकुमार मच्छिरके, गायत्री दीपक नागपुरे, राजेश्वरी मानदास बसेना, प्रदीप नागपुरे, ज्योती रायसिंह मच्छिरके, सागर लिल्हारे, देवचंद लिल्हारे, राधेश्याम गिरिया, रीता लिल्हारे, सुनील वाहने, सरोज कुंभलवार, संजयकुमार सुलाखे, प्रवीण दमाहे, प्रदीप लिल्हारे, शिवकुमार बिसेन, अंकित सूर्यवंशी, रेखा पटले, छाया पटले, सत्यशिला कटरे, माधुरी पटले, डीलेश्वरी बोपचे आणि साची टेंभरे या पीडितांनी दिला आहे.
पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या टीईटी २०२५ प्रक्रियेत हिंदी माध्यमाच्या उमेदवारांना रिक्त पदांचा प्राधान्यक्रम मिळाला नसल्याच्या तक्रारीची गोंदिया जिल्हा परिषदेने दखल घेतली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने १५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या आयुक्तांना पत्र पाठवून योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. ज्या उमेदवारांचे संपूर्ण शिक्षण हिंदी माध्यमातून झाले आहे, अशा उमेदवारांना पवित्र पोर्टलवर गोंदिया जिल्हा परिषदेतील रिक्त पदांसाठी इयत्ता ६ ते ८ आणि इयत्ता ९ ते १० या अध्यापनाचे माध्यम हिंदी उपलब्धच झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी तक्रारी केल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया आणि सालेकसा या दोन तालुक्यांत हिंदी माध्यमाच्या शाळा सर्वाधिक आहेत. मात्र जिल्हा परिषदेने पवित्र पोर्टलमध्ये चुकीची नोंदणी करून हिंदी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय केला, ही बाब जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पीडित त्यांच्याकडे गेले असता, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी सभापतींनी त्यांना हाकलून लावले आणि आम्ही तुमच्यासाठीच बसलो आहोत का, असा उलट प्रश्न विचारला, असे पीडितांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकारामुळे शिक्षण सभापतींचे नेमके काम काय, यावरही आता चर्चा सुरू झाली आहे.