गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:50 IST

घुग्घुसमध्ये नंदीबैल सजावट स्पर्धेने तान्हा पोळा उत्साहात साजरा

गांधी चौकात चिमुकल्यांच्या सजवलेल्या नंदीबैलांनी वेधले लक्ष, स्पर्धेत सर्व सहभागी मुलांना बक्षिसे.

घुग्घुसमध्ये नंदीबैल सजावट स्पर्धेने तान्हा पोळा उत्साहात साजरा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

घुग्घुस येथे तान्हा पोळा सण मोठ्या उत्साहात पार पडला. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि शेतकरी संस्कृतीची जाणीव करून देणारा हा सण साजरा करताना नव्या पिढीला पारंपरिक संस्कृतीची ओळख व्हावी, या हेतूने तान्हा पोळा आयोजन समिती घुग्घुस आणि भारतीय जनता पक्षाने गांधी चौक येथे नंदीबैल सजावट स्पर्धा भरवली.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी स्वतःच्या कल्पकतेने नंदीबैलांना विविध रंग, फुले, पारंपरिक कपडे आणि आकर्षक साहित्य वापरून सजवले. सजवलेले नंदीबैल घेऊन मुले उत्साहाने स्पर्धेत उतरली आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने गांधी चौक परिसराला सणासुदीचा रंग चढला.

स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आकर्षक सजावट, पारंपरिक मांडणी आणि मुलांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण तयार झाले. पालकांनीही आपल्या मुलांना प्रोत्साहन देत या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

नगरसेवक विवेक बोढे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, तान्हा पोळा ही केवळ एक परंपरा नाही तर आपल्या मातीत रुजलेली संस्कृती आणि शेतकरी जीवनाशी जोडलेली भावना आहे. आजच्या डिजिटल युगात मुलांना आपली माती, संस्कृती आणि पारंपरिक सण यांच्याशी जोडून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा कार्यक्रमांमुळे मुलांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल प्रेम, अभिमान आणि जिव्हाळा निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला नगरसेवक विवेक बोढे यांच्यासह ठाणेदार प्रकाश राऊत, आयोजन समितीचे अध्यक्ष गणेश कुटेमाटे, शिवसेनेचे शहराध्यक्ष महेश डोंगे, सुरेंद्र भोंगळे, सतीश बोन्डे आणि प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. जान्हवी सावे हिने २ हजार १ रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले, तर अंश कोयाडवारला १ हजार ५०१ रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले. रेआंश बोबडेने १ हजार १ रुपयांचे तृतीय पारितोषिक, मोहित बोबडेने ७०१ रुपयांचे चतुर्थ पारितोषिक तर मयंक घाटेने ५०१ रुपयांचे पाचवे पारितोषिक जिंकले. विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊनही सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच चिमुकल्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले, त्यामुळे सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

घुग्घुसमध्ये नंदीबैल सजावट स्पर्धेचे हे सलग नववे वर्ष आहे. गेल्या नऊ वर्षांपासून तान्हा पोळ्याच्या निमित्ताने पारंपरिक संस्कृती जपण्यासोबतच लहान मुलांना सण-परंपरांची ओळख करून देण्याचे काम आयोजन समितीकडून केले जात आहे. बदलत्या जीवनशैलीत पारंपरिक सणांचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर नागपुरे यांनी केले, तर आभार संजय भोंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ