गायमुख-पायेगाव खाडी पुलाचे 95% पायलिंग पूर्ण, घोडबंदर रोडला मिळणार पर्याय
एमएमआरडीएच्या गायमुख-पायेगाव खाडी पुलाच्या कामाला वेग, 42 महिन्यांत काम पूर्ण होण्याचे नियोजन.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ठाण्यातील घोडबंदर घाटातून रोज ये-जा करणाऱ्या हजारो वाहनधारकांसाठी आणि नोकरीसाठी दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या रस्त्यावर रोज होणारी ट्रॅफिकची कोंडी आणि अवजड वाहनांमुळे होणारा त्रास आता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) हाती घेतलेल्या गायमुख-पायेगाव खाडी पुलाच्या बांधकामाला चांगली गती मिळाली आहे.
खाडीतील पायलिंगचे काम आता 95 टक्के पूर्ण झाले असून, पिअर आणि पिअर कॅप उभारणीच्या कामाचा वेग वाढवण्यात आला आहे. हा पूल पूर्ण झाल्यावर घोडबंदर घाटाला एक सोयीचा आणि थेट पर्याय उपलब्ध होणार आहे.
गायमुख ते पायेगावदरम्यान उभारण्यात येणाऱ्या या चारपदरी उन्नत खाडी पुलाच्या बांधकामाची जबाबदारी एमएमआरडीएने अशोका बिल्डकॉन या कंपनीकडे सोपवली आहे. सध्या गायमुख ते पायेगाव हा प्रवास करण्यासाठी वाहनधारकांना फाऊंटन हॉटेल जंक्शन, चिंचोटी आणि त्यानंतर पायेगाव असा सुमारे 31.5 किलोमीटरचा लांब वळसा घालावा लागतो. नवीन पूल सुरू झाल्यानंतर हा लांबचा प्रवास टळणार असून ठाणे, भिवंडी आणि वसई या शहरांना जोडणारा थेट शॉर्टकट मिळणार आहे.
साडेसहा किलोमीटर लांबीच्या या चौपदरी पुलाच्या पायलिंगचे काम अंतिम टप्प्यात, म्हणजे 95 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जिथे पायलिंग पूर्ण झाले आहे, तिथे पिअर उभारणीचे काम सुरू झाले असून त्यावर पिअर कॅप बसवण्याचे कामही वेगाने चालू आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण प्रकल्पाचे आतापर्यंत 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा पूल पुढील 42 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यासाठी 1,551.18 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
ठाणे आणि आजूबाजूच्या भागातील दळणवळण सुधारण्यासाठी एमएमआरडीएच्या वाहतूक आराखड्यात या खाडी पुलाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. हा पूल पुढे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, ठाणे कोस्टल रोड, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, दिवा-वसई रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग 48 (NH-48) तसेच अंजूर-चिंचोटी रस्ता या पायाभूत प्रकल्पांशी जोडला जाणार आहे. यामुळे ठाणे शहराचे वाहतूक आणि प्रादेशिक आर्थिक केंद्र म्हणून असलेले महत्त्व आणखी वाढेल असे सांगण्यात येत आहे.
ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावर दिवसरात्र वाहनांची प्रचंड वर्दळ असते. ठाणे शहरातून मुंबईच्या पश्चिम उपनगरांकडे, मिरा-भाईंदरच्या दिशेने तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गाकडे जाणाऱ्या प्रवासी आणि मालवाहतुकीचा संपूर्ण ताण सध्या याच एका रस्त्यावर आहे. गायमुख-पायेगाव पूल प्रत्यक्ष वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर घोडबंदर रोडवरील अवजड वाहनांचा भार बऱ्याच प्रमाणात कमी होईल, ज्यामुळे हजारो वाहनधारकांचा प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि वेळ वाचवणारा ठरेल.