गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:23 IST

गणेशोत्सवासाठी वर्धा पोलिसांचा चोख बंदोबस्त, २४०० हून अधिक मनुष्यबळ तैनात

ध्वनी मर्यादा, लेझर लाईट बंदी आणि सोशल मीडियावर करडी नजर ठेवत वर्धा पोलिसांची गणेशोत्सव २०२६ साठी व्यापक तयारी.

गणेशोत्सवासाठी वर्धा पोलिसांचा चोख बंदोबस्त, २४०० हून अधिक मनुष्यबळ तैनात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गणेशोत्सव २०२६ शांततेत आणि शिस्तीत पार पडावा यासाठी वर्धा पोलीस दलाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूर्वतयारी केली आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, उत्सव उत्साहात व्हावा आणि त्याचवेळी ध्वनी प्रदूषण तसेच लेझर लाईटच्या वापरावर नियंत्रण राहावे, हा या तयारीमागचा उद्देश आहे. सण साजरा करताना सामाजिक सलोखा आणि सुरक्षितता जपली जावी, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपायांसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचाही आधार घेतला आहे.

ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३६ आणि कलम ३८(१) अंतर्गत आदेश काढले असून ते जाहीर करण्यात आले आहेत. लाऊडस्पिकर, अॅम्प्लीफायर आणि तत्सम उपकरणे वापरताना सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि शासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी नुसती कागदावर राहू नये यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता क्षेत्रांत Noise Level Meter वापरून ध्वनी पातळीचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग आधीच घेण्यात आले आहे, जेणेकरून उत्सवादरम्यान नियमभंग तात्काळ लक्षात येईल. नियम मोडणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणार आहे.

मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेझर लाईटमुळे नागरिक, वयोवृद्ध, लहान मुले आणि विशेषतः वाहनचालकांच्या डोळ्यांना धोका पोहोचू शकतो, हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, वर्धा यांनी कलम १६३ BNSS नुसार जिल्ह्यात लेझर लाईट वापरण्यास प्रतिबंध करणारे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कडक कारवाई होणार आहे.

उत्सव सुरळीत व्हावा यासाठी गणेश मंडळे, ध्वनीक्षेपक चालक-मालक, शांतता समिती आणि नागरिक यांच्यात समन्वय साधण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. पोलीस अधीक्षकांनी संबंधित सर्वांच्या बैठका घेऊन ध्वनी मर्यादा, मिरवणुकीतील शिस्त, वाहतूक व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावरही उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणेदारांनी शांतता समिती, आयोजक मंडळे व डीजे चालक-मालक यांच्यासोबत स्वतंत्र बैठका घेऊन स्थानिक पातळीवरील मिरवणूक मार्ग, वेळापत्रक आणि खबरदारीच्या उपायांबाबत समन्वय साधला.

यंदा वर्धा पोलिसांनी "गणराया उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा-२०२६" आयोजित केली आहे. सायबर सुरक्षित गणेशोत्सव, अंमली पदार्थ विरोधी अभियान, महिला व बाल सुरक्षा, वाहतूक सुरक्षा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, आरोग्य तपासणी शिबीर आणि कायदा-सुव्यवस्था शिस्त या विषयांवर ही स्पर्धा होणार असून प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर आणि पोलीस अधीक्षक कार्यालय स्तरावर प्रत्येकी ३ उत्कृष्ट गणेश मंडळांचा सन्मान केला जाणार आहे.

कोणतीही अनुचित घटना घडल्यास तातडीने प्रतिसाद देता यावा यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. पोलीस अधिकारी व अंमलदारांना जमाव नियंत्रण, संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण आणि जलद प्रतिसाद याबाबत प्रत्यक्ष सराव देण्यात आला. जिल्ह्यातील संवेदनशील भागांत रूट मार्चही काढण्यात आले.

सायबर पोलीस स्टेशन वर्धा येथे संपूर्ण उत्सव काळात २४x७ सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल कार्यरत राहणार आहे. अफवा, आक्षेपार्ह किंवा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ किंवा संदेशांवर करडी नजर ठेवली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पुढे पाठवू नयेत, संशयास्पद माहिती आढळल्यास ती तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी केले आहे.

बंदोबस्तासाठी ११४ पोलीस अधिकारी, १२०० पोलीस अंमलदार, २ दंगल नियंत्रण पथके, १ जलद प्रतिसाद पथक, १०८० होमगार्ड आणि १ एस.आर.पी.एफ. तुकडी तैनात राहणार आहे. गणेश मंडळे, मिरवणूक मार्ग, संवेदनशील व गर्दीची ठिकाणे तसेच महत्त्वाच्या चौकांवर गरजेनुसार अतिरिक्त बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

पोलिसांकडून मंडळे व नागरिकांना उत्सव साजरा करण्यास पूर्ण सहकार्य केले जाणार असले तरी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन, प्रतिबंधित लेझर लाईटचा वापर किंवा सार्वजनिक शांतता बिघडवणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही. नियमभंग झाल्यास आयोजक, डीजे चालक-मालक किंवा जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कडक कारवाई होईल.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी नागरिकांना उत्सव उत्साहात, मात्र शांतता व शिस्त राखून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. गणेश मंडळांनी ध्वनी मर्यादा, मिरवणुकीचे नियम, वाहतूक व्यवस्था आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, प्रतिबंधित लेझर लाईट वापरू नये आणि सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पसरवू नयेत, असे त्यांनी सांगितले. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, वर्धा पोलीस दल चोवीस तास सेवेसाठी सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ