गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:46 IST

गोंदिया: अंतिम यादीआधी नाव, पत्ता तपासण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

एसआयआर-2026 अंतर्गत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी नागरिकांना मतदार यादीतील तपशील पडताळण्याचे आवाहन केले.

गोंदिया: अंतिम यादीआधी नाव, पत्ता तपासण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026 (एसआयआर) अंतर्गत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. मतदार यादी निरीक्षक तथा नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रारूप मतदार यादीवर आलेले दावे आणि हरकती निकाली काढण्याच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रारूप मतदार यादी आधीच प्रसिद्ध झाली असून, अंतिम यादी येण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाने आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील नीट तपासून घ्यावेत, असे आवाहन बिदरी यांनी यावेळी केले. या बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की, उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय अवधाने, उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळला जाणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना बिदरी यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

मतदार यादीतील दावे, हरकती आणि दुरुस्ती अर्जांच्या प्रक्रियेचा आढावा घेताना बिदरी म्हणाल्या की, मतदारांनी स्वतःचे नाव, पत्ता, वय आणि इतर तपशील एकदा तपासून घ्यावेत. नाव नव्याने नोंदवायचे असल्यास, नाव किंवा पत्त्यात दुरुस्ती करायची असल्यास किंवा अन्य कोणताही बदल हवा असल्यास विहित नमुन्यातील अर्ज भरून सादर करावा.

ज्या मतदारांच्या नावात काही तफावत आढळली आहे किंवा ज्यांचे मॅपिंग अद्याप झालेले नाही, अशा मतदारांना नोटीस मिळाल्यानंतर स्थानिक बीएलओ किंवा बीएलए यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. आवश्यक कागदपत्रे घेऊन सुनावणीला हजर राहून संबंधित बाब पूर्ण करावी, असे सांगण्यात आले.

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांची नावे तपासता यावीत, तसेच वस्ती, तांडा, पाडे यांसारख्या दुर्गम भागातील रहिवाशांनाही मतदार यादी पडताळण्याची सोय व्हावी यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रारूप मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालये, मतदान केंद्रे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात आल्या असून, राजकीय पक्षांनाही त्या पुरवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

ज्यांचे नाव यादीत नाही किंवा जे 1 ऑक्टोबर 2026 रोजी 18 वर्षे पूर्ण करत आहेत, त्यांनी नमुना 6 भरावा. एखाद्या मतदाराचे नाव वगळण्याबाबत हरकत असल्यास नमुना 7, तर नाव, वय किंवा पत्त्यात दुरुस्ती हवी असल्यास अथवा एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर असल्यास नमुना 8 भरावा लागेल. हे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2026 आहे.

पहिल्या टप्प्यात मतदार प्रत्यक्ष जिथे राहतात तिथेच नोंदणी झाली की नाही, याची पडताळणी करण्यावर भर होता, त्यामुळे जे नमूद पत्त्यावर राहत नाहीत त्यांचा समावेश प्रारूप यादीत झालेला नाही. अशा मतदारांना सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी नाव नोंदवण्याची संधी आता उपलब्ध आहे. मृत मतदारांची नावे वगळण्यात आली असून, नवीन पात्र मतदारांची नोंदणी आणि आधी वगळल्या गेलेल्या पात्र नागरिकांची नोंदणी करण्याची संधीही या टप्प्यात आहे. त्यामुळे सध्याच्या प्रारूप यादीची आधीच्या आकडेवारीशी तुलना करून निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे आवाहन प्रशासनाने केले. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार असून, सर्व पात्र नागरिकांचा त्यात समावेश व्हावा यासाठी प्रशासन आवश्यक कार्यवाही करत आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ