दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयची एफआयआर, हत्या-बलात्काराचा संशय, अनेक बड्या नावांची चौकशी
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एफआयआर नोंदवली असून, तपासात अनेक राजकीय व पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख आहे.
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात सहा वर्षांनंतर मोठा वळण आला आहे. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या कडक आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने या प्रकरणी अधिकृतपणे एफआयआर नोंदवत तपासाची सूत्रे स्वतःकडे घेतली आहेत. समोर आलेल्या या एफआयआरच्या प्रतीत सामूहिक बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणे, पोलीस नोंदींमध्ये फेरफार करणे आणि दिशाच्या मोबाईल फोनशी छेडछाड केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
याच दरम्यान शुक्रवारी दिशाचे वडील सतीश सालियान हे आपल्या वकिलासोबत सीबीआय अधिकाऱ्यांसमोर हजर झाले आणि त्यांनी चार तासांहून अधिक वेळ आपला जबाब नोंदवला. यापूर्वी सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल करत आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता, आणि यात काही प्रभावशाली राजकीय व्यक्ती तसेच उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांवर थेट ठपका ठेवण्यात आला होता.
सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरनुसार, दिशाच्या मृत्यूशी संबंधित मूळ गुन्हा, कथित गुन्हेगारी कट, नंतर रचण्यात आलेली आत्महत्येची खोटी कथा, तसेच पुरावे दाबणे, नष्ट करणे किंवा त्यात फेरफार करणे या सगळ्या बाबींची सखोल चौकशी केली जाणार आहे. यात राजकारण व बॉलीवूडशी संबंधित आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, डिनो मोरिया, सूरज पंचोली, रोहन रॉय, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचे बॉडीगार्ड्स यांच्या नावांचा उल्लेख आहे. त्याचबरोबर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह, निलंबित एपीआय सचिन वाजे, तत्कालीन डीसीपी विशाल ठाकूर, एपीआय अशोक देवढे, पीआय जगदेव कलापाड, पीआय शैलेंद्र नागरकर, पीआय चिमाजी अढाव, पीआय अर्जुन रजाने आणि मालवणी पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांचीही नावे यात आहेत. पोस्टमार्टम उशिरा करणारे डॉक्टर, डॉ. संजय जाधव, कलिना फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी, एन. पी. भाले, रीजेंट गॅलेक्सी बिल्डिंगचे सुरक्षा रक्षक सुशील कुमार यादव व शिवमुराद गौतम, तसेच प्रीती राणे, प्रवीण राणे, अंकिता सातुर, इंद्रनील वैद्य, दीप अजमेरा, हिमांशु शिखारे, रेशा पडवाल, सतवंत सिंह, नावेद मुजावर, प्रियेश राणे आणि एसआयटीचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी यांचीही चौकशी होणार आहे. एफआयआरमध्ये नाव असणे म्हणजे ती व्यक्ती आरोपी ठरत नाही, असे स्पष्ट करत ठोस पुराव्याशिवाय कोणालाही आरोपी मानले जाऊ नये, असे न्यायालयाने बजावले आहे.
एफआयआरमध्ये दिशाच्या मोबाईल फोनबाबतही गंभीर शंका व्यक्त करण्यात आली आहे. 9 जून 2020 रोजी सकाळी 9:40 वाजता पोलिसांनी फोन ताब्यात घेतला होता, मात्र जप्त दाखवूनही तो सक्रिय राहिल्याचे आणि नंतरही वापरला गेल्याचे समोर आले. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संभाव्य संबंध तपासण्यासाठी फोन पुन्हा उघडल्याचा पोलिसांचा दावा उपलब्ध कागदपत्रांशी जुळत नसल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. एफआयआरनुसार हा फोन सचिन वाजे आणि आदित्य ठाकरे यांच्या ताब्यात होता आणि त्यांनी तो वापरला, तसेच फोनमधील माहितीच्या आधारे साक्षीदारांना धमकावण्यात आले व महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आल्याचाही आरोप आहे. दिशाच्या व्हजायनल आणि एनल स्वाब्सचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले होते, आणि आता हे सगळे वैद्यकीय पुरावे व कागदपत्रे सीबीआय पुन्हा तपासणार आहे.
दिशा सालियान ही सेलिब्रिटी मॅनेजर होती आणि तिने सुशांत सिंह राजपूतसोबतही काही काळ काम केले होते. 8 जून 2020 रोजी मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून खाली पडल्याने तिचा संशयास्पद मृत्यू झाला, आणि अवघ्या सहा दिवसांनी म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचाही मृतदेह आढळला होता. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी हा अपघाती मृत्यू असल्याचे नोंदवले होते आणि नंतर आत्महत्या असल्याचा निष्कर्ष काढत कोणताही कट नसल्याचे सांगितले होते. या प्रकरणात नाव आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सर्व आरोप निराधार असल्याचे म्हणत ही आपली बदनामी करण्यासाठी रचलेली राजकीय कारस्थाने असल्याचे स्पष्ट केले होते. 2 सप्टेंबरला मुंबई हायकोर्टाने सीबीआयला चौकशी करून एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आणि मुंबई विभागाच्या सीबीआय जॉइंट डायरेक्टरना अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्याची तपास अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दिले.