दिल्लीत महिलेकडून २०० कोटींची खंडणी मागितली, गोल्डी ब्रारच्या नावाने कॉल
दिल्लीतील सिव्हिल लाइन्समध्ये ५० वर्षीय महिलेला २०० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा कॉल आला असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.
दिल्लीतील सिव्हिल लाइन्स भागात राहणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेला तब्बल २०० कोटी रुपयांची खंडणी मागणारा कॉल आला आणि यामुळे पोलीस खात्यातही खळबळ उडाली. दिल्ली-एनसीआरमध्ये आधीही गुंडांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याची प्रकरणं झाली आहेत, पण इतकी मोठी रक्कम मागितली गेल्यामुळे हे प्रकरण पोलीस अतिशय गांभीर्याने घेत आहेत.
हा कॉल कुख्यात गुंड गोल्डी ब्रारच्या नावाने आला होता, असं सांगितलं जातं आहे. मात्र कॉल करणाऱ्याचा गोल्डी ब्रारशी खरंच काही संबंध आहे का, याची पडताळणी पोलीस करत आहेत. या प्रकरणातला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे परदेशात बसलेल्या गुन्हेगारी टोळ्यांना दिल्लीतल्या एखाद्या व्यक्तीची इतकी बारीक माहिती मिळते तरी कशी. संबंधित व्यक्तीची आर्थिक परिस्थिती, व्यवसाय, कुटुंब आणि संपर्क क्रमांक अशी माहिती टोळीपर्यंत नेमकं कोण पोहोचवतं, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये सक्रिय असलेल्या अनेक गुन्हेगारी टोळ्यांचं स्थानिक पातळीवर संपर्क आणि मदतनीसांचं जाळं असल्याचं आधीच्या तपासातून समोर आलं आहे. काही स्थानिक गुन्हेगार, व्यावसायिक क्षेत्रातली माणसं आणि मध्यस्थांकडून माहिती परदेशात बसलेल्या टोळीतल्या सदस्यांपर्यंत पोहोचत असल्याचा पोलिसांना संशय आहे. टार्गेट व्यक्तीचा व्यवसाय, आर्थिक क्षमता, कुटुंबाची माहिती, पत्ता आणि संपर्क क्रमांक हे सगळं या नेटवर्कमार्फत मिळवलं जात असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दिल्ली-एनसीआरसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातल्या गुन्हेगारी नेटवर्कमध्येही एकमेकांशी संपर्क असल्याचं तपास यंत्रणांचं निरीक्षण आहे.
पोलिसांच्या मते, खंडणी हा अशा टोळ्यांच्या कमाईचा मोठा स्रोत असतो. टोळीतले सदस्य देशात असोत किंवा परदेशात, त्यांच्यासाठी पैसा, स्थानिक संपर्क आणि गुन्ह्यांसाठी लागणारी साधनं उभी केली जातात. खंडणीची रक्कम वेगवेगळ्या मध्यस्थांमार्फत फिरवली जाते, असं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. काही प्रकरणांत हवाला आणि क्रिप्टोकरन्सीशी संबंधित व्यवहार वापरले जात असल्याचाही पोलिसांना संशय आहे. मिळालेल्या पैशाचा वापर टोळीचं नेटवर्क चालवण्यासाठी आणि वेगवेगळ्या बेकायदेशीर धंद्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी केला जातो, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
सिव्हिल लाइन्स प्रकरणातल्या महिलेची पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा तिच्या कुटुंबातल्या काही जुन्या वादांची माहिती समोर आली. महिलेच्या सासऱ्यांच्या निधनानंतर कुटुंबात वाद झाल्याचंही तपासात पुढे आलं आहे. त्यामुळे या धमकीचा संबंध कौटुंबिक वादाशी आहे का, याचाही तपास सुरू आहे. महिलेची आणि तिच्या कुटुंबाची माहिती कॉल करणाऱ्यापर्यंत नेमकं कोणी पोहोचवली, हा शोध घेणं पोलिसांसमोरचं आव्हान आहे.
पोलीस कॉलचं तांत्रिक विश्लेषण करत आहेत. कॉल इंटरनेटवरून केला होता की परदेशी मोबाइल नेटवर्क वापरलं होतं, याची पडताळणी सुरू आहे. तसंच कॉल करणाऱ्याचा गोल्डी ब्रारच्या टोळीशी संबंध आहे का, हेही तपासलं जात आहे. खंडणीची मागणी मान्य न झाल्यास काही गुन्हेगारी टोळ्या दहशत निर्माण करण्यासाठी हिंसक मार्ग वापरतात, असं निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने धमकी किंवा गोळीबारासारख्या घटना घडवून टार्गेटवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकरणातला २०० कोटींच्या मागणीमागचा खरा सूत्रधार कोण, महिलेला टार्गेट करण्यासाठी माहिती कोणी पुरवली आणि कॉलचा गोल्डी ब्रारशी प्रत्यक्ष संबंध आहे का, या प्रश्नांची उत्तरं तपासातून पुढे येतील.