'हनुमान अंश'ची कमाल; 2 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या सिनेमाने जगभरात 300 कोटींचा टप्पा गाठला
विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित 'हनुमान अंश' रिलीज होऊन 41 दिवस झाले असून, कमाई अजूनही सुरूच आहे.
फक्त 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'हनुमान अंश' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. सिनेमा रिलीज होऊन 41 दिवस उलटले तरी त्याची कमाई थांबलेली नाही. या सिनेमाने जगभरात 300 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या कमाईमुळे 'हनुमान अंश'ने 2026 मध्ये आलेल्या तब्बल 17 सिनेमांच्या वर्ल्डवाइड कलेक्शनला मागे टाकल्याचा दावा केला जातोय.
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, विशाल चतुर्वेदी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने रिलीजच्या 41व्या दिवशीही 6 कोटी रुपयांची कमाई केली. या दिवशी सिनेमाचे 9,203 शो लागले होते. भारतात आतापर्यंत सिनेमाने 237.13 कोटी रुपये कमावले असून भारतीय ग्रॉस कलेक्शन 280 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. तर वर्ल्डवाइड कलेक्शनचा आकडा 300.25 कोटी रुपयांवर गेला आहे.
'हनुमान अंश'ची निर्मिती अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये झाल्याचं सांगितलं जातंय. त्या तुलनेत 300.25 कोटींची वर्ल्डवाइड कमाई झाल्यामुळे सिनेमाच्या नफ्याची मोठी चर्चा सुरू आहे. दिलेल्या आकडेवारीनुसार, सिनेमाने आपल्या बजेटच्या तुलनेत मोठी कमाई करत 2026 मधल्या अनेक मोठ्या सिनेमांना मागे टाकलं आहे.
वर्ल्डवाइड कलेक्शनच्या तुलनेत 'हनुमान अंश'ने ज्या 17 सिनेमांना मागे टाकल्याचा दावा केला जातोय, त्यात 'मिर्झापूर द मूव्ही' (286 कोटी), 'भूत बंगला' (287.89 कोटी), 'धमाल 4' (230.61 कोटी), 'आवारापन 2' (213.6 कोटी), 'वेलकम टू द जंगल' (193.1 कोटी), 'कॉकटेल 2' (148 कोटी), 'राजा शिवाजी' (123 कोटी), 'मैं वापस आऊंगा' (99 कोटी), 'अल्फा' (99 कोटी), 'ओ रोमियो' (73 कोटी), 'है जवानी तो इश्क होना है' (75 कोटी), 'बंटवारा 1947' (54 कोटी), 'मर्दानी 3' (52 कोटी), 'द केरळ स्टोरी 2' (52 कोटी), 'पति पत्नी और वो' (51 कोटी), 'चांद मेरा दिल' (38 कोटी) आणि 'हैवान' (14 कोटी) यांचा समावेश आहे.
'हनुमान अंश' हा सिनेमा नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित असल्याचं सांगितलं जातंय. सिनेमात नीम करोली बाबांची भूमिका शोभिनव सत्या यांनी साकारली आहे. सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये पूर्णिमा तिवारी, चंदन के आनंद आणि अनिल रस्तोगी यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. कलाकारांच्या अभिनयासोबतच सिनेमाच्या कथानकाचीही सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
41 दिवसांनंतरही सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील कमाई सुरू असून, पुढच्या काळात त्याचा वर्ल्डवाइड कलेक्शनचा आकडा आणखी वाढतो का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.