'देवघर ऑन रेंट' चित्रपटाचा ट्रेलर लाँच, २५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार
अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शन यांची सांगड घालणाऱ्या 'देवघर ऑन रेंट' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत लाँच झाला असून चित्रपट २५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
अध्यात्म, रहस्य, थरार आणि ॲक्शन अशा वेगवेगळ्या रंगछटा एकत्र आणणारा 'देवघर ऑन रेंट' हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला असून त्यातून एक गूढ आणि थरारक कथानक समोर आलं आहे. 'देवघर' आणि 'रेंट' या दोन शब्दांच्या जोडणीमागे नेमकं काय दडलं आहे, याबद्दलची उत्सुकता ट्रेलरमुळे आणखी वाढली आहे. हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रासोबतच बेळगाव, हैदराबाद, इंदोर आणि बडोदा या शहरांमध्येही प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीच्या क्षणांपासूनच चित्रपटातलं गूढ आणि गडद वातावरण जाणवायला लागतं. संवादांमधली खोली, संशयास्पद घडामोडी आणि पात्रांमधले संघर्ष यामुळे कथेची उत्कंठा वाढत जाते. पोलीस तपास, गुन्हेगारी जग आणि एका रहस्यमय देवघराभोवती घडणाऱ्या घटना अशा तीन धाग्यांची गुंफण ट्रेलरमध्ये दिसते. फक्त रहस्य आणि थरार एवढंच नाही, तर चित्रपटाला भावनिक बाजूही आहे, असे संकेत ट्रेलरमधून मिळतात. देवघराच्या परिसरात घडणाऱ्या आध्यात्मिक आणि अनाकलनीय घटनांमुळे कथा नेमकं कोणतं वळण घेणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
चित्रपटात ॲक्शन सीक्वेन्सलाही तितकंच महत्त्व दिलं गेलं आहे. पाठलाग, हाणामारी आणि संघर्षाचे प्रसंग ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. दाक्षिणात्य पद्धतीच्या ॲक्शनचा वापर करून चित्रपटाचा आवाका मोठा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
कलाकारांच्या फौजेत निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नागरकर, सिद्धेश्वर झाडबुके आणि गौतमी पाटील यांचा समावेश आहे. यासोबतच 'केजीएफ' फेम गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत, त्यामुळे मराठी आणि दाक्षिणात्य कलाकारांची जोडी चित्रपटात एकत्र पाहायला मिळेल.
आनंदी पिक्चर्स अमरावतीने सादर केलेल्या आणि राधाकृष्ण प्रोडक्शनने निर्मिती केलेल्या या चित्रपटाची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी स्वरूप सावंत यांनी सांभाळली असून चित्रपटाची मूळ संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची आहे. कथा, पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी संगीत दिलं असून कोरिओग्राफी किशोर दळवी यांनी केली आहे. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी चैतन्य साळुंके यांनी सांभाळली, तर पार्श्वसंगीत रोहित नागभीडे यांनी दिलं आहे. ॲक्शन सीक्वेन्स राकेश पाटील आणि कार्तिक डंगरी यांनी सांभाळले. कला दिग्दर्शन दिलीप कंधारे, वेशभूषा अपेक्षा गांधी सोनी आणि रंगभूषा सुजीत सुरवसे यांनी केली. कार्यकारी निर्माते अनुनेहा घोडके असून निर्मिती व्यवस्थापक यश सणस आहेत. सिंक साऊंडची जबाबदारी अक्षय लोणदे यांनी, प्रकाशयोजना शर्मा यांच्या टीमने आणि प्रॉडक्शन हेड म्हणून विजय म्हस्के यांनी काम पाहिलं.
२५ सप्टेंबरला 'देवघर ऑन रेंट' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अध्यात्म, रहस्य, थरार आणि ॲक्शन यांचं हे मिश्रण प्रेक्षकांना कसं भावतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.