गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
05:21 IST

दहिसर-भाईंदर लिंक रोड प्रकल्पाला वेग; पाइलिंग, पाइल-कॅपचे काम सुरू, ऑक्टोबरमध्ये लाँचिंग गर्डर

मुंबईच्या कोस्टल रोड (उत्तर) प्रकल्पाला जोडणाऱ्या दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या कामाने वेग घेतला असून अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी कार्यस्थळाला भेट देत भूसंपादन आणि सुरक्षेबाबत सूचना दिल्या.

दहिसर-भाईंदर लिंक रोड प्रकल्पाला वेग; पाइलिंग, पाइल-कॅपचे काम सुरू, ऑक्टोबरमध्ये लाँचिंग गर्डर
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

मुंबईच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड (उत्तर) प्रकल्पाचा भाग असलेल्या दहिसर-भाईंदर लिंक रोडच्या (डीबीएलआर) कामाला आता चांगली गती मिळाली आहे. पुलाच्या पायासाठी पाइलिंग म्हणजेच खोल पाया रचण्याचे आणि पाइल-कॅपचे काम सुरू झाले आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2028 च्या अंतिम मुदतीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले असून त्या दिशेने काम पुढे सरकत आहे. या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेले लाँचिंग-गर्डरचे काम ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे.

आंतरबदल आणि जोडरस्त्यासह हा मेगा प्रकल्प एकूण सुमारे 60 किलोमीटरचा असून यामुळे वेसावे आणि भाईंदर ही नगरे किनारा रस्त्याने जोडली जाणार आहेत. प्रकल्पाच्या उभारणीचे काम ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर-भाईंदर जोड रस्ता (DBLR) अशा एकूण सात टप्प्यांत विभागण्यात आले आहे. यापैकी दहिसर-भाईंदर जोड रस्ता हा मुंबई आणि मिरा-भाईंदर परिसरासाठी महत्त्वाचा असून सध्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आहे. या रस्त्यामुळे दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम असा थेट आणि जलद रस्ते संपर्क निर्माण होणार आहे.

या जोड रस्त्याची एकूण लांबी सुमारे 5.135 किलोमीटर इतकी आहे. यात उन्नत मार्ग, खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्ता, खाडीवरील उन्नत संरचना, खारपाण जमिनीवरील उन्नत मार्ग, वाहतूक विखुरण्यासाठी जोडमार्ग व आंतरबदल तसेच उड्डाणपूल अशा विविध प्रकारच्या अभियांत्रिकी संरचनांचा समावेश आहे.

दहिसर-भाईंदर जोड रस्ता प्रकल्पातील सुमारे 3.83 किलोमीटर लांबीचा आणि 45 मीटर रूंदीचा मुख्य उन्नत रस्ता हा मुंबई किनारा रस्त्याच्या (उत्तर) अंतिम भागाचा हिस्सा आहे. या कार्यस्थळाला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रारंभिक कामांची माहिती घेतली. सध्या तिथे गॅबियन भिंतीचे कुंपण उभारण्याचे काम सुरू आहे, तसेच पुलाच्या पायाभरणीसाठी पाइल्स आणि त्यावर पाइल कॅप तयार करण्यात येत आहे.

आतापर्यंत 60 पायाभूत खांब (पाइल), 5 पाइल कॅप, पुलाचे 4 आधारस्तंभ (पिअर), आधारस्तंभाचा शीर्षभाग (पिअर कॅप) आणि पुलाचा बांधकाम भाग (सेगमेंट) 9 अशी कामे पूर्ण झाली आहेत. कार्यस्थळी अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध असून तात्पुरती प्रवेश पूल यंत्रणाही कार्यान्वित आहे. लाँचिंग गर्डरच्या कामाबाबत सविस्तर माहिती अभिजीत बांगर यांनी घेतली.

या पाहणीदरम्यान बांगर यांनी अधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे निर्देश दिले. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया प्राधान्यक्रम ठरवून वेगाने पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले. यासाठी विविध प्राधिकरणांसह मिरा-भाईंदर महानगरपालिकेचेही सहकार्य घेण्याची सूचना त्यांनी केली. सुरक्षेसंदर्भातील प्रमाणित कार्यप्रणालीचे (SOP) काटेकोरपणे पालन करावे आणि काम सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीने कार्यस्थळी बॅरिकेडिंग करावे, असेही त्यांनी नमूद केले. कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावीत, आणि हे संपूर्ण काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नियोजन व अंमलबजावणी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ