छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश मिरवणुकीत ट्रेलर घुसला, दोघांचा मृत्यू, सात जखमी
पिंप्री राजा गावात बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत अनियंत्रित ट्रेलर घुसल्याने भीषण अपघात, चालक आणि दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.
गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिंप्री राजा गावात घडली. बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकीत अचानक एक अनियंत्रित ट्रेलर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. सणाच्या दिवशीच गावात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पिंप्री राजा गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबरला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पिंप्री राजा गावात गणरायाच्या आगमनाची मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि ढोल-ताशांच्या गजरात सुरू होती. त्याचवेळी दहेगाव-करमाड रस्त्यावरून करमाडच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रेलरचे (MH-21-BH-7416) वळणावर अचानक ब्रेक फेल झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रेलर थेट मिरवणुकीत घुसला.
भरधाव वेगाने आलेल्या या ट्रेलरने आधी गणेशमूर्ती असलेल्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. एवढ्यावरच न थांबता ट्रेलर पुढे गेला आणि त्याने एका दुचाकीस्वारालाही चिरडले. दुचाकी थेट ट्रेलरच्या चाकाखाली आल्यामुळे हा अपघात अधिकच भीषण ठरला.
या दुर्घटनेत ट्रेलरचा चालक रमेश लहुजी बनसोडे (वय 51) आणि विठ्ठल रामभाऊ जाधव (वय 38) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघेही पिंप्री राजा गावचे रहिवासी होते. मिरवणुकीत सहभागी असलेले आणखी सात जण या अपघातात जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये गणेश पवार, हर्षवर्धन पवार, वैभव भावले, नामदेव बनसोडे, विष्णू राजने, अमोल फतपुरे आणि प्रकाश पाखरे यांचा समावेश आहे.
डोळ्यादेखत घडलेल्या या थरारक अपघातामुळे मिरवणुकीत एकच गोंधळ आणि पळापळ झाली. गावकऱ्यांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात पोहोचवले. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस स्टेशनचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत आणि जमादार जयसिंग नागलोत हे पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. ट्रेलरचे ब्रेक खरोखरच निकामी झाले होते की अपघातामागे अतिवेग किंवा अन्य काही कारण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच दोन निष्पाप जीव गेल्यामुळे गावातील आनंदाचे रूपांतर क्षणार्धात दुःखात झाले.
याशिवाय दुसऱ्या एका घटनेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर खवटी गावाजवळ भीषण अपघात झाला. गणेशोत्सवासाठी कोकणातील चिपळूणच्या दिशेने पोलादपूरहून दुचाकीवरून येणाऱ्या तरुण-तरुणीचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी महामार्गालगत सुमारे 25 ते 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात दुचाकीस्वार सतीश निवृत्ती पाटे (वय 29, रा. पोलादपूर) याचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेली अक्षता अरविंद कवडे (रा. चिपळूण) गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.