गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:49 IST

चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय परिसरासाठी ५० एकर जमिनीची मागणी, मुनगंटीवारांचे पत्र

चंद्रपूर आणि पूर्व विदर्भातील रुग्णांना स्थानिक पातळीवर अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन हस्तांतरणाची मागणी केली.

चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय परिसरासाठी ५० एकर जमिनीची मागणी, मुनगंटीवारांचे पत्र छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसराचा विस्तार करण्यासाठी सुमारे ५० एकर शासकीय जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना पत्र दिले आहे.

चंद्रपूर आणि पूर्व विदर्भातील रुग्णांना गंभीर आजारांच्या उपचारासाठी दुसऱ्या शहरात जावे लागू नये आणि स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळावी, हा या मागणीमागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला लागून असलेली ही जमीन उपलब्ध झाल्यास तिथे डेंटल कॉलेज, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नर्सिंग कॉलेज, शैक्षणिक विभाग, रुग्णालयीन सुविधा, विद्यार्थी वसतिगृहे, पार्किंग आणि अंतर्गत रस्ते अशा पायाभूत सुविधा एकाच परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने उभारता येतील, असे आमदार मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री असताना चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कॅन्सर हॉस्पिटल उभारणीसाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यामुळे चंद्रपुरात वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत.

अलीकडेच चंद्रपूरच्या शासकीय नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळाली असून, त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना नर्सिंग शिक्षणाच्या नव्या संधी मिळणार आहेत. यासोबतच चंद्रपुरात डेंटल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.

कॅन्सर तसेच अन्य गंभीर आजारांच्या उपचारासाठी रुग्णांना नागपूर, मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांकडे जावे लागू नये, यासाठी चंद्रपुरातच अत्याधुनिक उपचार सुविधा उभारणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचावा, हा या प्रयत्नांचा केंद्रबिंदू असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.

जमीन हस्तांतरणासाठी महसूल विभागाच्या स्तरावर आवश्यक तपासणी, मोजणी, अभिलेखांची पडताळणी आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणीही आमदार मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

चंद्रपूरला केवळ वैद्यकीय महाविद्यालय असलेले शहर न बनवता, पूर्व विदर्भातील वैद्यकीय शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण आणि अत्याधुनिक उपचारांचे सक्षम केंद्र बनवण्याचा संकल्प या मागणीमागे असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ