गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:46 IST

बालसुरक्षेसाठी 'खुली बात' चॅटबॉट; मुंबई पालिकेच्या १०० शाळांमध्ये मिसिंग लिंक ट्रस्टचा उपक्रम

मिसिंग लिंक ट्रस्टने कॅपजेमिनी इंडियाच्या मदतीने व्हॉट्सॲपवर एआय-आधारित बालसुरक्षा चॅटबॉट सुरू केला असून मुंबई पालिकेच्या १०० शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे.

बालसुरक्षेसाठी 'खुली बात' चॅटबॉट; मुंबई पालिकेच्या १०० शाळांमध्ये मिसिंग लिंक ट्रस्टचा उपक्रम
एआयने तयार केलेले प्रातिनिधिक चित्र; हे प्रत्यक्ष घटनेचे छायाचित्र नाही | PT24

मुलांच्या सुरक्षेची सुरुवात मोकळ्या संवादातून होते, हे लक्षात घेऊन मिसिंग लिंक ट्रस्टने (एमएलटी) कॅपजेमिनी इंडियाच्या सहकार्याने 'खुली बात' नावाचा एआय-सक्षम आणि व्हॉट्सॲपवर चालणारा बालसुरक्षा चॅटबॉट सुरू केला आहे. एनसीआरबीच्या 'क्राइम इन इंडिया 2024' या अहवालानुसार भारतात पॉक्सो कायद्याअंतर्गत 69,191 प्रकरणांची नोंद झाली असून यातील 96 टक्क्यांहून अधिक प्रकरणांत आरोपी अनोळखी नसून मुलांच्या जवळच्या परिचयातील व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुलांना वैयक्तिक मर्यादा, संमती आणि सुरक्षित नातेसंबंध समजावून सांगणे, तसेच अस्वस्थ करणारी परिस्थिती ओळखून वेळीच मदत मागता येणे, हे अत्याचार रोखण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. यासोबतच पालक, शिक्षक आणि काळजीवाहूंनाही मुलांचे म्हणणे नीट ऐकून घेता यावे व योग्य आधार देता यावा, यासाठी आवश्यक माहिती असणे तितकेच गरजेचे आहे.

'खुली बात' म्हणजेच मोकळेपणाने साधलेला संवाद. पालक आणि काळजीवाहूंना बालसुरक्षेबाबत विश्वासार्ह माहिती व मार्गदर्शन सहज मिळावे, या उद्देशाने हा चॅटबॉट तयार करण्यात आला आहे. मुलांशी वैयक्तिक मर्यादा, संमती, नातेसंबंध, ऑनलाइन सुरक्षा, अत्याचार आणि शोषण या विषयांवर कसा संवाद साधावा, याबाबत प्रौढांना यातून मार्गदर्शन मिळते. गरज पडल्यास योग्य मदत आणि उपयुक्त साधनांची माहितीही चॅटबॉटमार्फत दिली जाते. कोणत्याही प्रौढ व्यक्तीला व्हॉट्सॲपवर 6003060040 या क्रमांकावर 'Hi' असा मेसेज पाठवून या चॅटबॉटशी संवाद सुरू करता येतो.

महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आयपीएस, आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते या चॅटबॉटचे अनावरण करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या 100 शाळांमध्ये बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी मिसिंग लिंक ट्रस्ट काम करत आहे. या भागीदारीअंतर्गत तीन क्षेत्रांत काम सुरू आहे. शाळांमधील कार्यक्रमांमधून 10,000 किशोरवयीन मुला-मुलींना सुरक्षाविषयक शिक्षण देणे, पालक-शिक्षक-काळजीवाहूंसाठी 'खुली बात' हा एआय-सक्षम चॅटबॉट विकसित करणे आणि विविध संबंधित घटकांच्या परिषदा व चर्चांमधून बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्याची व त्यावर योग्य प्रतिसाद देण्याची व्यवस्था बळकट करणे, या तीन बाबींचा यात समावेश आहे.

मिसिंग लिंक ट्रस्टच्या संस्थापक विश्वस्त आणि सीईओ लीना केजरीवाल यांनी सांगितले की, 'खुली बात'मध्ये एआय मॉडेलच्या माध्यमातून केवळ सर्वसाधारण सल्ला दिला जात नाही. गेल्या 10 हून अधिक वर्षांच्या प्रत्यक्ष क्षेत्रातील कामाच्या अनुभवावर आधारित हा चॅटबॉट तयार करण्यात आला असून त्यातील मार्गदर्शन स्थानिक पातळीवरील प्रत्यक्ष जोखमींवर आधारित आहे आणि भारतीय कुटुंबांना ज्या वास्तवाला सामोरे जावे लागते, त्याचाही संवेदनशीलपणे विचार करण्यात आला आहे. प्रत्येक उत्तर काळजीपूर्वक तयार केलेल्या माहितीच्या संग्रहावर आधारित असून ही माहिती जमवताना पूर्वग्रह, लिंगभाव आणि सत्तासंबंध यांचा जाणीवपूर्वक विचार करण्यात आला आहे. डिजिटल ॲक्सेस आणि साक्षरतेच्या विविध टप्प्यांवरील प्रौढांनाही तो सहज वापरता यावा, अशी याची रचना आहे. केजरीवाल यांच्या मते हे केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित नाही; गरज भासल्यास कुटुंबांना त्यांच्या परिसरातील प्रत्यक्ष मदत आणि तक्रार नोंदवण्याच्या योग्य मार्गांशीही जोडले जाते, जेणेकरून प्रौढांना समोरची परिस्थिती समजून घेऊन योग्य पाऊल उचलता येईल.

कॅपजेमिनी इंडियाचे व्हाइस प्रेसिडेंट आणि सीएसआर हेड कुमार अनुराग प्रताप म्हणाले की, मुले ऑनलाइन अधिक वेळ घालवत असल्याने तंत्रज्ञानासोबत नव्या संधींबरोबरच नव्या प्रकारच्या जोखमीही निर्माण होत आहेत, त्यामुळे अशा घटना रोखणे आणि संभाव्य धोके लवकर ओळखून योग्य पावले उचलणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे. पालक आणि काळजीवाहू आधीपासून वापरत असलेल्या प्लॅटफॉर्मवरून बालसुरक्षेविषयी विश्वासार्ह माहिती आणि साधने सहज उपलब्ध करून देण्यासाठी 'खुली बात'मध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

मिसिंग लिंक ट्रस्टच्या मिसिंग अवेअरनेस अँड स्कूल सेफ्टी प्रोग्राम (एमएएसएसपी) या व्यापक प्रतिबंधात्मक उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून 'खुली बात' सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमातून किशोरवयीन मुला-मुलींना बालकांवरील लैंगिक अत्याचार, ऑनलाइन सुरक्षा, वैयक्तिक मर्यादा, विश्वास संपादन करून गैरफायदा घेण्याचे प्रकार, अत्याचाराबद्दल बोलणे आणि मदत मागणे याबाबत आवश्यक माहिती व कौशल्ये दिली जातात. 'खुली बात'च्या माध्यमातून ही व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि सुरक्षाविषयक शिक्षण, मोकळा संवाद व गरज पडल्यास वेळीच मदत मागणे या गोष्टी मुलांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे, हे एमएलटीचे उद्दिष्ट आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ