Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
'महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण 2026'च्या अंमलबजावणीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उबर, ओला यांसह ॲप टॅक्सी कंपन्यांना चालकांची संपूर्ण माहिती आणि कागदपत्रे तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश दिले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
'महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६' प्रभावीपणे राबवण्यासाठी ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आपल्या चालकांची संपूर्ण माहिती परिवहन विभागाकडे सादर करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. चालकांची ओळख, वास्तव्य आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पात्र चालकांना 'धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी मंडळा'चे सदस्यत्व दिले जाणार आहे. यासाठी चालकांना डोमिसाइल प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक माहिती तीन महिन्यांच्या आत सादर करावी लागणार आहे.
'महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६'च्या अंमलबजावणीबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात एक आढावा बैठक झाली. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते, तर राज्यभरातील प्रादेशिक परिवहन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. याशिवाय भारत टॅक्सी, रॅपिडो, उबर, ओला, शालिनी कॅब आणि सिटीफ्लो या ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधीही बैठकीला हजर होते.
बैठकीत ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये काम करणाऱ्या चालकांना कल्याणकारी मंडळामार्फत विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. चालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना कामगार कायद्यानुसार मिळणाऱ्या सेवा-सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकांची ओळख आणि वास्तव्य निश्चित होणे गरजेचे आहे, असे मंत्री सरनाईक म्हणाले. यासाठी चालकांनी डोमिसाइल प्रमाणपत्र सादर करणे तसेच व्यवहारिक मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या अटी पूर्ण करून पात्र ठरलेल्या चालकांना परिवहन विभागाकडून बॅज दिला जाईल आणि त्यांना कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्वही मिळेल, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही मंडळाच्या विविध योजनांचा फायदा घेता येईल, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
ॲग्रीगेटर धोरणानुसार चालकांना आवश्यक सुविधा देताना प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित कंपन्यांना केली. अपघात आणि गुन्हेगारीच्या घटना टाळण्यासाठी चालकांचे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे काटेकोरपणे तपासावीत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांना चालकांची आवश्यक माहिती गोळा करून परिवहन विभागाकडे सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत चालकांची संपूर्ण माहिती, डोमिसाइल प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीच्या शेवटी पुन्हा एकदा दिले.