गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:49 IST

ॲप टॅक्सी चालकांची कागदपत्रे तीन महिन्यांत हवीत, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

ओला, उबरसारख्या ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांना चालकांची संपूर्ण माहिती परिवहन विभागाकडे सादर करावी लागणार आहे. पात्र चालकांना कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व मिळणार आहे.

ॲप टॅक्सी चालकांची कागदपत्रे तीन महिन्यांत हवीत, परिवहन मंत्र्यांचे निर्देश छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राज्यातील ओला, उबरसारख्या ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना आता त्यांच्याकडे काम करणाऱ्या सगळ्या चालकांची संपूर्ण माहिती परिवहन विभागाकडे द्यावी लागणार आहे. यासाठी कंपन्यांना पुढील तीन महिन्यांची मुदत देण्यात आली असून, हे बंधन 'महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण 2026'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी घालण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत हे निर्देश दिले.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत चालकांची ओळख, त्यांचे वास्तव्य, डोमिसाईल प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे यांची काटेकोर पडताळणी केली जाणार आहे. चालकांची ओळख आणि कागदपत्रे पडताळून पात्र ठरलेल्या चालकांना 'धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी मंडळा'चे सदस्यत्व दिले जाणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

मंत्रालयातील मंत्री सरनाईक यांच्या दालनात झालेल्या या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते स्वतः होते. बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, परिवहन विभागाचे संबंधित अधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. यासोबतच भारत टॅक्सी, रॅपिडो, उबर, ओला, शालिनी कॅब आणि सिटीफ्लो या ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधीही या बैठकीला हजर होते.

ॲपआधारित टॅक्सी सेवेत काम करणाऱ्या चालकांना कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा फायदा मिळावा, तसेच चालक आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकांची ओळख, वास्तव्य आणि कागदपत्रांची पडताळणी होणे गरजेचे असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले. यासाठी चालकांना आपले डोमिसाईल प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चालकांना व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असून, पात्र ठरलेल्या चालकांना परिवहन विभागाकडून बॅज दिला जाणार आहे. पात्र चालकांना कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व देऊन त्यांच्या कुटुंबीयांनाही मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

ॲग्रीगेटर धोरणानुसार चालकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देतानाच प्रवाशांची सुरक्षितता सर्वात आधी सुनिश्चित करावी, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले. अपघात आणि गुन्हेगारीच्या घटना टाळण्यासाठी चालकांचे अर्ज, ओळखपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे यांची काटेकोरपणे पडताळणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

संबंधित ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांना त्यांच्या चालकांची संपूर्ण माहिती जमवून परिवहन विभागाकडे सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या तीन महिन्यांत चालकांची संपूर्ण माहिती, डोमिसाईल प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ