गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:47 IST

अंगणवाडी सेविका, मदतनिसांना ग्रॅच्युइटी देण्याबाबत शासन सकारात्मक: मंत्री तटकरे

पोषण माहाच्या राज्यस्तरीय शुभारंभप्रसंगी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मुंबईत घोषणा.

अंगणवाडी सेविका, मदतनिसांना ग्रॅच्युइटी देण्याबाबत शासन सकारात्मक: मंत्री तटकरे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना उपदान म्हणजेच ग्रॅच्युइटी देण्याच्या मागणीबाबत राज्य शासनाची भूमिका सकारात्मक आहे, अशी महत्त्वाची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे 9व्या राष्ट्रीय पोषण माहाच्या राज्यस्तरीय शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना 'माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी' अशी होती.

पोषण अभियान समाजातील शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा वाटा मोठा असल्याचे मंत्री तटकरे यांनी नमूद केले. लहान मुले, गरोदर माता आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासन पोहोचते आणि त्यातूनच सुदृढ महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आहार आणि आरोग्याबाबत जनजागृती करतानाच बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात असून, यासाठी महिला व बालविकास, आरोग्य आणि आयुष या तिन्ही विभागांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे मंत्री तटकरे म्हणाल्या. जन्मापासूनच बालकांना योग्य पद्धतीने शिशु अभ्यंग मिळणे गरजेचे असून, त्याचे महत्त्व मातांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष विभागाचा सहभाग घेण्यात आला आहे. आयुष विभागामार्फत अंगणवाडी सेविका व मदतनिसांना मार्गदर्शन देऊन ही माहिती मातांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

डिजिटल अंगणवाड्यांमधील स्क्रीनवर आयुष विभागाने तयार केलेले आरोग्य व पोषणविषयक व्हिडिओ नियमित दाखवून ती माहिती गरोदर व स्तनदा मातांपर्यंत पोहोचवावी, अशी सूचनाही मंत्री तटकरे यांनी यावेळी केली.

सक्षम अंगणवाडी प्रकल्प योजनेंतर्गत स्नेहा सामाजिक संस्था आणि एकात्मिक बालविकास सेवा यांच्यात करार करण्यात आला असून, त्याअंतर्गत मुंबईतील 817 अंगणवाड्या आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज करून सक्षम केल्या जाणार आहेत.

कार्यक्रमात आयुष विभागाच्या डॉ. शुभांगी ठाकूर यांनी बालकांच्या मसाज व काळजीबाबत सादरीकरण करत मार्गदर्शन केले, तर आरसीएचच्या डॉ. उपाली वाघमारे यांनी अॅनिमिया या विषयावर माहिती दिली. आयुक्त माधवी सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या एकात्मिक बालविकास सेवेच्या रंगीत लोगोचे, वेबपेजचे आणि पोषण आहार प्रार्थनेचे उद्घाटनही मंत्री तटकरे यांच्या हस्ते झाले.

गेल्या वर्षीच्या 8व्या राष्ट्रीय पोषण माहात उत्कृष्ट काम केल्याबद्दल वर्धा, हिंगोली आणि नागपूर या जिल्हा कार्यालयांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वर्धाच्या जिल्हा कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे व सहकारी, हिंगोलीचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विजय बोराटे आणि नागपूरचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कैलास घोडके यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वर्धा, मुंबई आणि नाशिक या जिल्ह्यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये मनिषा कुरसंगे, मुंबईच्या जिल्हा कार्य अधिकारी प्रेमा घाडगे, मुंबई उपनगर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे, पर्यवेक्षक भाऊसाहेब बोरकर आणि नाशिकचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांचा समावेश होता. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल ज्योती गायकवाड, शुभांगी लोहकर आणि कांता गायकवाड या अंगणवाडी सेविकांचाही सन्मान करण्यात आला.

याच कार्यक्रमात प्रीशा धीवर, स्वामिनी कोलहाले आणि सुनिता मोगल या लाभार्थ्यांना योजनेच्या लाभाच्या रकमेचे धनादेश वितरित करण्यात आले. लेक लाडकी योजनेचा लाभ आता डीबीटीमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ