येमेनमध्ये AI चा वापर, हुथींनी बनवला कमांडरचा बनावट आवाज आणि क्षेपणास्त्र कोड
येमेनमधील संघर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर किती धोकादायक पातळीवर पोहोचला आहे, हे उघड झाले आहे. हुथी बंडखोरांनी एका वरिष्ठ लष्करी कमांडरच्या आवाजाची नक्कल करून सैनिकांमध्ये संभ्रम पसरवला, तर दुसरीकडे क्षेपणास्त्र बनवण्यासाठीही AI चा वापर झाल्याचे अँथ्रोपिकच्या अहवालातून समोर आले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मध्यपूर्वेतील येमेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अत्यंत धोकादायक वापर झाल्याचं समोर आलं आहे. इराण-समर्थित हुथी बंडखोरांवर आरोप आहे की त्यांनी येमेनी लष्कराच्या नॅशनल रेझिस्टन्स फोर्सेसचे प्रमुख आणि वरिष्ठ लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल तारिक सालेह यांच्या आवाजाची नक्कल करण्यासाठी प्रगत AI तंत्रज्ञानाचा वापर केला.
लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील मोक्याच्या 'मोचा' शहरावर ताबा मिळवण्यासाठी हुथी बंडखोर आणि येमेनी लष्करात भीषण लढाई सुरू असतानाच हा बनावट ऑडिओ मेसेज पसरवण्यात आला. सालेह यांच्यासारखा हुबेहूब आवाज असलेल्या या AI-निर्मित क्लिपमध्ये सैनिकांना असा संदेश दिला जात होता की, "युद्धात कधी मागे हटावं लागतं तर कधी पुढे जावं लागतं; सैन्य वाचवण्यासाठी सर्व तुकड्यांनी मोचा शहरातून त्वरित माघार घ्यावी." या बनावट संदेशामुळे आघाडीवर लढणाऱ्या सैनिकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आणि त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न झाला.
हा ऑडिओ मेसेज सोशल मीडिया आणि स्थानिक मेसेजिंग अॅप्सवर वेगाने व्हायरल झाल्यानंतर येमेनी लष्कराच्या मीडिया टीमने तातडीने खुलासा केला. मोचा शहरातून प्रक्षेपित होणाऱ्या 'अल-जुम्हूरिया टीव्ही' या सॅटेलाइट चॅनलने सांगितलं की, जनमताची दिशाभूल करण्यासाठी आणि सैन्याचं मनोबल तोडण्यासाठी हुथींनी AI वापरून हा खोटा ऑडिओ तयार केला होता. कमांडर तारिक सालेह यांच्या मीडिया विंगनेही स्पष्ट केलं की, लष्कराशी संबंधित कोणतेही अधिकृत आदेश किंवा निवेदनं फक्त अधिकृत लष्करी माध्यमांमधूनच जारी होतात, आणि सैनिकांनी व नागरिकांनी अशा अनधिकृत ऑडिओ संदेशांवर विश्वास ठेवू नये. याच काळात हुथींनी मध्यरात्री सैनिकांना आत्मसमर्पणाचे मेसेजही पाठवले, ज्यात शस्त्रं खाली ठेवल्यास माफी देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं.
कमांडरच्या आवाजाची नक्कल करण्याखेरीज, येमेनमध्ये AI च्या लष्करी वापराबाबत आणखी एक गंभीर अहवाल समोर आला आहे. अमेरिकन AI कंपनी अँथ्रोपिकने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या १४५ पानी सुरक्षा अहवालात खुलासा केला आहे की, उत्तर येमेनमधील एका शस्त्रास्त्र विकास गटाने अँथ्रोपिकच्या 'क्लॉड कोड' या AI मॉडेलचा वापर करून क्षेपणास्त्रं आणि रॉकेट गाइडन्स सिस्टीमसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचा प्रयत्न केला. या गटातील शस्त्रास्त्र इंजिनिअर्सनी मानवी सॉफ्टवेअर इंजिनिअर्सऐवजी AI कडून गायडेड रॉकेट्स, २,००० किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं आणि हायपरसॉनिक ग्लाइड व्हेइकलसाठी कोडिंग लिहून घेतलं. नेव्हिगेशन, पोझिशन एस्टिमेशन आणि फ्लाइट सिम्युलेशनसाठीही AI चा वापर केला जात होता.
अँथ्रोपिकने सांगितलं की त्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी यातील बऱ्याच मागण्या ब्लॉक केल्या होत्या, पण युझर्सनी वेगवेगळ्या सेशन्समध्ये काम विभागून सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. एका चाचणी रॉकेटचं उड्डाण अपयशी ठरल्यानंतर हुथी इंजिनिअर्सनी अपयशाचं कारण शोधण्यासाठी अवघ्या काही तासांत पुन्हा AI कडे धाव घेतली होती. हे लक्षात येताच अँथ्रोपिकने या उपक्रमाशी जोडलेली सर्व खाती ब्लॉक केली आणि धोक्याची माहिती जागतिक सुरक्षा यंत्रणांसोबत शेअर केली.
सायकोलॉजिकल वॉरफेअरसाठी डीपफेक आवाजाचा वापर आणि क्षेपणास्त्र कोडिंगसाठी AI चा वापर, या दोन्ही घडामोडींमुळे हे स्पष्ट होतं की आधुनिक युद्धभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता एक धोकादायक शस्त्र बनत चालली आहे. या घटनेमुळे जागतिक स्तरावर सायबर सुरक्षा आणि लष्करी तंत्रज्ञानावरील नियंत्रणाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.