जागतिक ओझोन दिन: पृथ्वीभोवतीचे संरक्षक कवच वाचवणे इतके गरजेचे का, इतिहास आणि महत्त्व
दरवर्षी १६ सप्टेंबरला जगभरात 'आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस' साजरा केला जातो. पृथ्वीभोवती निसर्गाने तयार केलेल्या ओझोन थर या संरक्षक कवचाचे महत्त्व लोकांना समजावं, त्याच्या ऱ्हासाबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि पर्यावरणाचा तोल सांभाळण्यासाठी ठोस पावलं उचलली जावीत, हा या दिवसामागचा उद्देश आहे. समतापमंडलात (स्ट्रॅटोस्फिअर) असणारा हा ओझोन थर सूर्यापासून येणाऱ्या घातक अतिनील किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यापासून रोखतो. हा थर नसता तर पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचं अस्तित्वच धोक्यात आलं असतं.
विसाव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात शास्त्रज्ञांनी ओझोन थराला पडणाऱ्या छिद्रांबद्दल आणि त्याच्या ऱ्हासाबद्दल धोक्याचा इशारा दिला होता. क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFCs), हॅलोन्स आणि इतर ओझोनक्षयकारक रसायनं या थराला मोठं नुकसान पोहोचवत असल्याचं समोर आलं. या संकटावर उपाय शोधण्यासाठी १६ सप्टेंबर १९८७ रोजी कॅनडातल्या मॉन्ट्रियल शहरात आंतरराष्ट्रीय परिषद भरवण्यात आली. या परिषदेत ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या रसायनांच्या उत्पादनावर आणि वापरावर बंदी घालणारा 'मॉन्ट्रियल प्रोटोकॉल' हा ऐतिहासिक करार जगातल्या अनेक देशांनी मान्य केला. या कराराची आठवण म्हणून आणि पर्यावरणाबाबत सतत जागरूकता राहावी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १९९४ मध्ये एक ठराव मंजूर करत १६ सप्टेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस' म्हणून घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी जगभरातल्या देशांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांमधून साजरा होतो.
ओझोन थराचा ऱ्हास झाल्यामुळे सूर्याची अतिनील किरणं थेट पृथ्वीवर पोहोचतात. या किरणांच्या थेट संपर्कात आल्यामुळे माणसांमध्ये त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणं यांसारखे गंभीर आजार होतात. फक्त माणसांच्या आरोग्यावरच नाही, तर शेती, वनस्पती आणि समुद्रातल्या जीवसृष्टीवरही याचा वाईट परिणाम होतो. समुद्रातले प्लँक्टन नष्ट होतात, त्यामुळे सागरी अन्नसाखळी विस्कळीत होते आणि पिकांचं उत्पादनही घटतं.
जागतिक ओझोन दिन हा फक्त कार्यक्रम भरवण्याचा दिवस नाही, तर प्रत्यक्ष कृतीचा संदेश देणारा दिवस आहे. प्लास्टिकवर पूर्ण बंदी घालणं, मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं आणि हरित तसंच स्वच्छ ऊर्जेला प्राधान्य देणं हाच यावरचा मुख्य उपाय आहे. घरातले एअर कंडिशनर आणि फ्रिज इको-फ्रेंडली तंत्रज्ञानाचे वापरणंही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक नागरिक आणि सरकार एकत्र येऊन हरित उपक्रम राबवतील, तेव्हाच पुढच्या पिढीसाठी सुरक्षित आणि निरोगी पृथ्वी सोडणं शक्य होईल.