वीकेंड शॉपिंगमध्ये AI ठरणार गाईड, सांगणार काय घ्यायचं आणि कुठे मिळेल सगळ्यात कमी किंमत
गूगल लेन्स, ChatGPT आणि शॉपिंग ॲपमधल्या AI फीचर्सच्या मदतीने वीकेंड शॉपिंग सोपं आणि वेळ वाचवणारं होऊ शकतं.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शनिवार-रविवार आला की अनेकांचा शॉपिंगला जायचा प्लॅन असतो. पण एका वस्तूसाठी चार-चार दुकानं फिरूनही मनासारखी गोष्ट मिळत नाही आणि त्यात पूर्ण दिवस निघून जातो. आता मात्र फोनमधल्या AI टूल्सच्या मदतीने हा वेळ वाचवता येतो. गूगल लेन्स, ChatGPT आणि शॉपिंग ॲपमधलं AI वापरून काही मिनिटांतच बेस्ट डील शोधणं शक्य आहे.
रस्त्यात किंवा इंस्टाग्रामवर एखादा ड्रेस, शूज किंवा घड्याळ आवडलं, पण ते कुठे मिळेल हे माहीत नसतं, अशा वेळी Google Lens कामाला येतो. फक्त त्या वस्तूचा फोटो काढायचा. गुगलचं AI लगेच Amazon, Myntra, Flipkart अशा सगळ्या साईटवर शोधून ती वस्तू सगळ्यात स्वस्त कुठे मिळतेय हे सांगू शकतं. यासाठी दुकानं फिरण्याची गरज उरत नाही, एका फोटोतच काम होतं.
कपडे घेताना "हे माझ्यावर चांगलं दिसेल का" किंवा "कोणता रंग घेऊ" हा प्रश्न पडतोच. यासाठी आता कोणाला विचारायची गरज नाही. ChatGPT किंवा Gemini ला आपला रंग, उंची आणि गरज सांगितली, उदाहरणार्थ ऑफिससाठी कपडे हवेत, तर AI लगेच कोणता शर्ट कोणत्या पँटवर चांगला दिसेल, कोणती ट्रेंडिंग स्टाईल आहे आणि सोबत कोणती बॅग किंवा बूट घ्यायचा हे सुचवतं. म्हणजे स्टायलिस्टला पैसे देण्याऐवजी हे काम AI फ्री मध्ये करून देतं.
वीकेंडला जवळपास सगळीकडे सेल असतो, पण कोणत्या कार्डवर जास्त सूट मिळतेय हे शोधणं डोक्याला ताप असतो. यासाठी AI ला "या आठवड्यात मोबाईलवर किंवा टीव्हीवर कोणत्या बँकेच्या कार्डवर सगळ्यात जास्त ऑफर आहे" असं विचारलं की सगळ्या वेबसाईट चेक करून AI लिस्ट देतं. बजेट सांगितलं तर त्यानुसारच डील शोधून मिळते, ज्यामुळे हजारो रुपये वाचू शकतात.
फोन किंवा मिक्सर घेण्याआधी रिव्ह्यू वाचायचे झाले तर हजार रिव्ह्यू वाचायला अर्धा दिवस जातो. पण आता Amazon वर वस्तूच्या खाली AI summary दिलेली असते. सगळ्या लोकांचे रिव्ह्यू वाचून AI त्या वस्तूत काय चांगलं आणि काय वाईट आहे हे सांगतं, त्यामुळे पाच मिनिटांत ती वस्तू घ्यायची की नाही हे ठरवता येतं.
शनिवार-रविवारी मॉलमध्ये प्रचंड गर्दी असते, पार्किंगला जागा नसते आणि बिलिंगला मोठी लाईन लागते. यातून वाचायचं असेल तर Google Maps मधलं Popular Times हे AI वर चालणारं फीचर वापरता येतं. कोणत्या मॉलमध्ये किती वाजता गर्दी कमी असेल हे ते सांगतं, आणि त्या वेळेत गेल्यास बराच वेळ वाचतो. त्यामुळे या वीकेंडला बाहेर पडण्यापूर्वी पाकिटासोबत फोनमधलं AI पण तयार ठेवलं तर वेळ, पैसे वाचतील आणि डोक्याला तापही होणार नाही.