विसर्जन व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह; वसई किनाऱ्यावर गणेशमूर्तींची विटंबना, पालिका-पोलिसांची धावपळ
वसई किल्ला जेट्टी परिसरात गणेश विसर्जनानंतर मूर्तींचे अवशेष किनाऱ्यावर तुटलेल्या अवस्थेत आढळले, त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी आणि प्रशासनाच्या विसर्जन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
वसई किल्ला जेट्टीजवळ गणेश विसर्जनानंतर काही मूर्तींचे अवशेष तुटलेल्या स्थितीत किनाऱ्यावर पडलेले आढळले. काही मूर्ती अर्धवट विसर्जित अवस्थेत चिखलात अडकलेल्या दिसल्या. या प्रकारामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या असून विसर्जन व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वसई परिसरातील विविध विसर्जन घाटांवर मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची संख्या मोठी आहे. समुद्रातील भरती-ओहोटी, लाटा आणि चिखलामुळे काही मूर्ती किनाऱ्यावर किंवा उथळ भागात पुन्हा बाहेर येण्याची शक्यता नेहमीच असते, आणि यंदाही तसाच प्रकार घडून काही मूर्तींचे अवशेष पुन्हा किनाऱ्यावर वाहून आले.
वसईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी सांगितले की, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत आधीच सूचना देण्यात आली होती आणि रात्रीच्या वेळी या गणेशमूर्तींचे विसर्जन उशिरा समुद्राच्या मध्यभागी करण्यात आले होते. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत किनाऱ्यावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. सहाय्यक आयुक्त संगीता घाडीगावकर यांनी सांगितले की, समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे या मूर्ती पुन्हा बाहेर आल्या होत्या. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तातडीने त्या मूर्ती ताब्यात घेऊन पुन्हा विसर्जित करण्यात आल्या. पुढील विसर्जनाच्या वेळी याबाबत अधिक दक्षता घेतली जाईल, असेही घाडीगावकर यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवात विसर्जनानंतर संबंधित यंत्रणेने जेट्टी आणि आजूबाजूच्या किनारपट्टी परिसराची पाहणी करून बाहेर आलेल्या मूर्तींचे अवशेष तातडीने हटवणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. भाविकांनी श्रद्धेने आणि विधिवत निरोप दिलेल्या गणरायाच्या मूर्तीची अशा अवस्थेत विटंबना होऊ नये, यासाठी विसर्जन व्यवस्थापन अधिक काटेकोर करण्याची मागणी शिवसेना उबाठा गटाचे दत्ता जाधव यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणेने मूर्तींचे अवशेष तातडीने ताब्यात घेऊन पुन्हा समुद्रात विसर्जित केल्याची माहिती देण्यात आली. पुढील विसर्जनाच्या वेळी अधिक दक्षता घेतली जाईल, असे प्रशासनाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले.
विसर्जनानंतर निर्माल्य, मूर्तींचे अवशेष आणि इतर पूजासाहित्य समुद्रकिनारी किंवा चिखलात पडून राहू नये, यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे. विशेषतः प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन होण्यास बराच कालावधी लागत असल्याने, त्यांचे अवशेष जर समुद्रकिनारी तसेच पडून राहिले तर पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.