खासदार धानोरकरांच्या कार्यालयात बाप्पा विराजमान
वरोरा शहरात गणेशोत्सवाचा उत्साह, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्री गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना
वरोरा शहरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वरोरा येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयात श्री गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या मंगल सोहळ्याला मानस धानोरकर आणि पार्थ धानोरकर हे दोघेही उपस्थित होते आणि त्यांनी स्वतः पूजा केली. दोघांच्या हस्ते वेदोक्त मंत्रोच्चारात महाआरती पार पडली. यावेळी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि नागरिक बाप्पाच्या दर्शनासाठी हजर होते.
गणेशोत्सवाचे औचित्य साधत कार्यालयाच्या परिसराला आकर्षक फुलांनी आणि नेत्रदीपक रोषणाईने सजवण्यात आले होते. सकाळच्या सुमारास पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया" अशा जयघोषात बाप्पाची मूर्ती कार्यालयात आणली गेली. त्यानंतर श्रींची स्थापना करण्यात आली आणि मानस धानोरकर व पार्थ धानोरकर यांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा व मंगल आरती झाली. बाप्पाच्या आगमनामुळे संपूर्ण कार्यालयाचे वातावरण भक्तीमय आणि चैतन्यमय होऊन गेले होते.
यावेळी मानस आणि पार्थ धानोरकर यांनी उपस्थित नागरिकांशी गप्पा मारत सगळ्यांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बाप्पाच्या चरणी अशी प्रार्थना केली की, "विघ्नहर्त्या बाप्पाच्या आशीर्वादाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेच्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात, शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता-भगिनींच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे."
स्व. खासदार बाळू धानोरकर आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीत वरोरा येथील हे जनसंपर्क कार्यालय नेहमीच सर्वसामान्य जनतेसाठी हक्काचे ठिकाण राहिले आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या अडीअडचणी घेऊन याच कार्यालयात येत असतात, आणि त्यामुळेच या कार्यालयातील गणेशोत्सवाला दरवर्षी वेगळे महत्त्व असते. पहिल्याच दिवसापासून बाप्पाच्या दर्शनासाठी तालुक्यातील वेगवेगळ्या भागांतून कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या प्रतिष्ठापना सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, महिला प्रतिनिधी, युवक कार्यकर्ते तसेच धानोरकर कुटुंबाचे नातेवाईक आणि वरोरा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या कार्यक्रमामुळे वरोरा शहरातील वातावरण उत्साहाने भारावून गेले होते.