गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:00 IST

लेझर आणि डीजेच्या दणदणाटात डोळे-कान धोक्यात, तज्ज्ञांचा सणासुदीत सावधगिरीचा सल्ला

सणासुदीत होणारा लेझर लाइट आणि डीजेचा अतिरेक डोळ्यांच्या रेटिनाला आणि कानांच्या श्रवणक्षमतेला कायमची इजा पोहोचवू शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

लेझर आणि डीजेच्या दणदणाटात डोळे-कान धोक्यात, तज्ज्ञांचा सणासुदीत सावधगिरीचा सल्ला छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सणासुदीच्या दिवसांत रोषणाईचा झगमगाट आणि डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई हे चित्र आता सार्वजनिक उत्सवांचा एक भागच बनून गेलंय. पण या काही क्षणांच्या मजेसाठी आपण आपल्या डोळ्यांची नजर आणि कानांची ऐकण्याची क्षमता तर पणाला लावत नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

शक्तिशाली लेझर किरणं आणि प्रचंड मोठा आवाज यामुळे डोळ्याच्या रेटिनाला इजा होऊ शकते, तसंच कानातल्या संवेदनशील पेशींचंही कायमचं नुकसान होऊ शकतं, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. लेझरचा प्रकाश साध्या रोषणाईपेक्षा खूप जास्त केंद्रित असतो. त्यामुळे शक्तिशाली लेझर किरण थेट डोळ्यात गेला तर तो रेटिनावर इतक्या तीव्रतेनं केंद्रित होतो की भाजल्यासारखी इजा होऊ शकते. यातून पुढे नजरेसमोर काळा डाग दिसणं, नजर धूसर होणं किंवा कायमचा 'ब्लाइंड स्पॉट' तयार होण्याचा धोका असतो.

यातली खास गोष्ट म्हणजे सुरुवातीला वेदना जाणवत नाहीत, त्यामुळे ही इजा दुर्लक्षित राहू शकते. दुसरीकडे डीजे, मोठे स्पीकर्स आणि मिरवणुकांमधला सततचा कर्णकर्कश आवाज कानातल्या नाजूक पेशींवर ताण आणतो. कानात शीळ वाजल्यासारखं वाटणं किंवा भुणभुण होणं, कान बंद झाल्यासारखं वाटणं, काही काळ कमी ऐकू येणं ही याची सुरुवातीची धोक्याची लक्षणं आहेत. वारंवार मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिलं तर आवाजामुळे कायमची श्रवणक्षमता कमी होऊ शकते.

केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितलं की, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवाजाची तीव्रता जशी वाढते, तसा सुरक्षित संपर्काचा कालावधी कमी होत जातो. त्यामुळे स्पीकर्सपासून अंतर राखणं, मोठ्या आवाजात जास्त वेळ न राहणं आणि कानांना मधून मधून विश्रांती देणं गरजेचं आहे. पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये उत्सवांमधल्या लेझर बीमवर आधीच निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक सुरक्षिततेसाठी अशा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी, असं मत यावर व्यक्त होतंय.

डॉ. सुपे यांनी सांगितलं की, सणाचा आनंद जरूर घ्यावा, पण डोळे आणि कानांच्या आरोग्याची किंमत मोजून नाही. लेझर किरण थेट डोळ्यांकडे वळवू नयेत आणि डीजेच्या स्पीकर्सजवळ जास्त वेळ उभं राहणं टाळावं. नजरेत अचानक बदल जाणवला किंवा कानात सतत आवाज येत असल्यास लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असंही त्यांनी नमूद केलं. उत्सवाचा उजेड डोळ्यांसाठी सुरक्षित आणि संगीत कानांसाठी सुखद राहील, याची काळजी घेणं हाच या सणासुदीतला खरा आरोग्यदायी संकल्प ठरू शकतो.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ