सोनं खरेदी करणाऱ्यांना धक्का! हॉलमार्किंग दरात तब्बल 67 टक्के वाढ, वाचा किती फरक पडणार
सणासुदीच्या तोंडावरच सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग शुल्कात मोठी वाढ करण्यात आली असून याचा थेट परिणाम सराफा बाजारावर आणि ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.
सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सणासुदीच्या काळातच दागिन्यांच्या हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 66.7 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ही नवी दरवाढ 14 सप्टेंबर 2026 पासून देशभरात लागू झाली असून याचा थेट परिणाम सराफा बाजारावर आणि पर्यायाने ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे. दिवाळीसारखे सण जवळ आले असताना अशा वेळी ही दरवाढ जाहीर झाल्यामुळे सराफा बाजारात याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
नव्या दरांबद्दल बोलायचं झालं तर सोन्याच्या दागिन्यावर किंवा इतर आर्टिकल्सवर हॉलमार्किंग करण्यासाठी आधी 45 रुपये आकारले जायचे, आता त्याऐवजी 75 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच प्रति आर्टिकल शुल्कात 30 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे सोन्याच्या कंसाइनमेंटसाठीचं किमान शुल्क मात्र 200 रुपये इतकंच कायम ठेवण्यात आलं आहे, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. चांदीच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग शुल्कातही कोणताही बदल झालेला नाही, ते आधीप्रमाणेच 35 रुपये प्रति आर्टिकल राहणार आहे.
भारतीय मानक ब्युरो म्हणजेच BIS च्या नियमांनुसार हॉलमार्किंगचं शुल्क दागिन्यांच्या वजनावर आकारलं जात नाही, तर प्रति आर्टिकल म्हणजे नगाच्या आधारावर आकारलं जातं. त्यामुळे दागिना लहान असो किंवा मोठा, प्रत्येक दागिन्यासाठी ठरलेलं शुल्कच द्यावं लागतं. या वाढीमुळे ज्वेलरच्या एकूण हॉलमार्किंग खर्चात मोठी वाढ होणार आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर एखाद्या सराफाला 100 दागिन्यांची हॉलमार्किंग करायची असेल, तर आधी त्यासाठी 4500 रुपये खर्च यायचा, तो आता वाढून 7500 रुपये होणार आहे. म्हणजे शंभर दागिन्यांच्या हॉलमार्किंगमागे तब्बल 3000 रुपयांचा जास्तीचा भुर्दंड ज्वेलरला सोसावा लागणार आहे.
ही दरवाढ प्रामुख्याने ज्वेलरच्या तपासणी आणि प्रमाणिकरणाच्या खर्चात वाढ करते. मात्र हा वाढलेला भुर्दंड ग्राहकांकडून थेट वसूल करायचा की ज्वेलरनं स्वतः उचलायचा, हे पूर्णपणे संबंधित दुकानदाराच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाच्या बिलात थेट 30 रुपयांची वाढ होईलच असं नाही, हा निर्णय दुकानागणिक वेगळा असू शकतो.
तरीही सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करणं गरजेचं मानलं जातं. त्यामुळे खरेदी करताना दागिन्यांवरचा BIS लोगो, कॅरेट आणि 6 अंकी HUID कोड आवर्जून तपासावा, असा सल्ला दिला जातो.