Mumbai Crime: दोघींच्या नादात ३२ तरुण गेले दिल्लीला, अन् त्यांच्यासोबत जे घडलं ते ऐकून पोलीसही चक्रावले
सिंगापूरमध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून ३२ तरुणांकडून १३ लाख रुपये उकळल्याचा प्रकार जुहूमध्ये उघडकीस आला असून जुहू पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईतील जुहू भागात परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्या ३२ तरुणांची मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. सिंगापूरमध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून या तरुणांकडून तब्बल १३ लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी जुहू पोलिसांनी आशना शेट्टी आणि दिव्या पांचाल या दोन महिलांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशना शेट्टी आणि दिव्या पांचाल यांनी ३२ तरुणांना सिंगापूरमध्ये नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. या प्रकरणातील तक्रारदार रमेश शेट्टी हे परवानाधारक परदेशी रोजगार आणि मनुष्यबळ सल्लागार म्हणून काम करतात, म्हणजे परदेशात नोकरी शोधणाऱ्यांना मदत करणं हाच त्यांचा व्यवसाय आहे. दोन्ही महिलांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून रमेश शेट्टी यांनी हे ३२ तरुण एकत्र जमवले आणि त्यांना सिंगापूरमधील नोकरीसाठी तयार केलं. नोकरीच्या प्रोसेससाठी या सगळ्यांकडून मिळून एकूण १३ लाख रुपये धनादेशाद्वारे घेण्यात आले, ही रक्कम आशना शेट्टी आणि दिव्या पांचाल यांच्या 'व्ही.ए. इमिग्रेशन' या कंपनीच्या नावे जमा करण्यात आली.
पैसे घेतल्यानंतर तरुणांना वैद्यकीय तपासणीसाठी दिल्लीला पाठवण्यात आलं. पण तिथे गेल्यावर त्यांना दिलेला पत्ताच चुकीचा निघाला, त्यामुळे तपासणीसाठी योग्य ठिकाण शोधण्यातच त्यांचा वेळ आणि पैसा गेला. या तरुणांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून दुसऱ्या ठिकाणी जाऊन मेडिकल चेकअप करून घ्यावं लागलं. यानंतर दोन्ही महिलांनी सिंगापूरमधील नोकरीसाठी आवश्यक असल्याचं सांगत तरुणांना काही कागदपत्रं दिली, असा आरोप आहे.
पुढे या कागदपत्रांमध्ये मोठा घोळ असल्याचं उघड झालं. तरुणांना देण्यात आलेलं 'हॉलिडे परमिट' बनावट असल्याचं समोर आलं, म्हणजे ज्या आधारावर ते सिंगापूरला जाणार होते तेच कागद खोटे निघाले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे सिंगापूरला नोकरीसाठी जाण्याचा प्रयत्न केल्यावर तरुणांना तिथे अडचणींना सामोरं जावं लागलं. सिंगापूर सरकारने या तरुणांना पुन्हा नोकरीसाठी देशात येण्यास परवानगी नाकारली, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं या तरुणांच्या लक्षात आलं. या सगळ्या प्रकारामुळे त्यांना पैशांचा फटका तर बसलाच, शिवाय मानसिक त्रासही सहन करावा लागला.
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार रमेश शेट्टी यांनी जुहू पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आशना शेट्टी आणि दिव्या पांचाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. परदेशातील नोकरीच्या आमिषाने आणखी कुणाची फसवणूक झाली आहे का, या रॅकेटमध्ये आणखी कोण सामील आहे आणि तरुणांना दिलेली कागदपत्रं नेमकी कुठून आली, याचा तपास जुहू पोलीस करत आहेत.